Wednesday, May 4, 2011

आज गोकुळात रंग खेळतो हरी...





वसंत सुरु झाला, पळस, पांगारा फुलले, आंब्याने मोहोर धरला, कोकीळा निनादू लागल्या. सर्वत्र उस्ताह आनंदाच वातावरण होत आणि त्यात भर म्हणून आज होळी होती. सार गोकुळ आनंदाने भरल होत. दरवर्षी कृष्णच आपल्याला भिजवतो, रंग लावतो, यंदा आपणच त्याला रंग लावूयात असा निश्चय राधेने केला आपल्या साख्यांसमावेत तिने लपण्याची जागा निश्चित केली. हौदात रंग कालवून तयार केला आणि हातात रंग घेऊन ती गोकुळाबाहेरच्या एका मोठ्या पाषाणामागे दडून बसली. आता थोड्यावेळात कृष्ण येईल आणि मग आपण त्याला पाठीमागून जाऊन रंग लावूयात, सार नियोजन उत्कृष्ठ होत. पाषाणामागून येणारी कृष्णाची वहिवाट स्पष्ट दिसत होती. जरी तिला सगळ दिसत असाल तरी ती मात्र  कुणाच्याही दृष्टीक्षेपात येणारं नाही ह्याची तिने खबरदारी घेतली होती. नित्य नियमाने कृष्ण गायी गुरांना घेऊन येईल मंजुळ पावा वाजवेल ह्या कल्पनेत ती बराच वेळ बसून राहिली. आता एव्हाना सुर्य मध्यान्हाला आला होता. पोटात कावळे ओरडू लागले, अजून कसा कृष्ण आला नाही एक अनामिक हुरहूर तिच्या मनात दाटली. आता कृष्ण आपल्याला विसरला तर नाही ना? आज होळी आहे हेही तो विसरला असेल का? उगाच आपण दडून बसलो, सगळ्या गोकुळात आता होळीचे रंग खेळत असतील, कृष्णाने आपल्या सख्यांना भिजवले असेल, म्हणजे दरवर्षी त्याच्या हातून सर्वप्रथम भिजून घेण्याचा आपला मान यंदा गेला? असे विचार मनात आले आणि तीच मन हळवं झालं, कितीही झालं तरी तीच कृष्णावर निस्सीम प्रेम होत. तिच्या अश्या वागण्याने कृष्ण तिला विसरून जाईल असा विचारदेखील आत्तापर्यंत तिच्या मनाला शिवला नव्हता. करायला गेलो एक आणि झालं भलतच ती झरकन पाषाणा मागून उठली. हातातला रंग एव्हाना घर्मबिंदुंनी ओला झाला होता, त्याचे ओघळ कोपरावरून खाली ओघळले होते. तिने तो रंग तसाच मातीत टाकून दिला आणि हात झटकून ती मागे वळणार इतक्यात मागून दोन रंगलेले हात तिच्या डोळ्यासमोर आले, आणि काही कळण्याच्या अगोदरच तिला संपूर्ण रंगवून टाकले. हा कृष्णच!  ज्याच्यासाठी आपण लपून बसलो तो साक्षात इथे आलाय म्हणजे तो आपल्या सख्यांबरोबर नाही, तो आपल्याला विसरलेला नाही, तिच्या डोळ्यात चमक आली, ओठांवर हसू आल, कृष्णाकडून रंग लावून घेण्यातला आनंद तिच्या रोमारोमातून उमटू लागला. ती उमलू लागली. पण दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही फसलो आपण कृष्णाला ह्या वर्षी देखील प्रथम रंगवू नाहीच शकलो ह्याची थोडीशी खंत तिच्या उरी दाटली. मातीत मिसळलेला रंग तिने उचलून झपदिशी कृष्णावर फेकला आणि गोकुळाच्या दिशेने ती धावली. एकमेकांवर मनसोक्त रंग उधळत, छेडछाड करत त्यांनी होळी साजरी केली. कृष्ण राधेची रासक्रीडा अवघ गोकुळ कौतूकान बघत होत. आज राधेला कृष्णाने रंग लावला होता. राधा कृष्णमय झाली होती. राधेच स्वतःच असं अस्तित्वच उरल नव्हत, उरला होता तो फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्णच!!!

तेजश्री            

No comments:

Post a Comment