Wednesday, May 4, 2011

देवदिवाळी


                     वैकुंठ स्मशानभूमी हे नाव जरी घेतलं तरी लोक भुवया वर करतात, आणि राष्ट्रीय कला अकादमीने मात्र तिथेच जाऊन दिपोस्तव साजरा  करायचं आणि तेथे अखंड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करायचं ठरवलं. दरवर्षी हे कार्यकर्ते देवदिवाळीला न चुकता वैकुंठात दिपोस्तव साजरा करतात आणि छोटीशी का होईना पण तेथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना भेट देतात. ह्या वर्षी ह्याला १२ वर्ष झाली. यंदा मला हा सोहळा जवळून बघण्याची संधी मिळाली आणि कळून चुकल किती थोर काम करता आहेत हे सगळे कार्यकर्ते, आणि त्याच बरोबर मीही ह्यांच्यात सहभागी झाले ह्याचा अभिमान वाटला. 
                     काल सायंकाळी म्हणजे देवदिवाळीला ( मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा) आम्ही सगळे राष्ट्रीय कला अकादमीचे कार्यकर्ते वैकुंठात जमलो. वैकुंठस्मशानभूमीतील विद्युतदाहिनीजवळील मंडपात आम्ही पोहचेपर्यंत सुनील सरांनी रांगोळी रेखाटायला सुरवातही केली होती, काकस्पर्षाची कल्पना घेऊन अतिषय सुंदर रांगोळी रेखाटण्याच काम सुरु झाल होत, आम्हीही आपापल्यापरीने मदत करायला लागलो. पिंडाला तीन कावळे शिवतानाचा प्रसंग इतका जिवंत रेखाटलेला पाहून खूप छान वाटल. सकाळपासून असलेली नैराश्याची झळ दूर गेली, आधी वाटल होत कस असे तिथल वातावरण, आणि कश्या असतील तिथल्या लोकांच्या मनस्थित्या? पण तिथल उस्ताहाच वातावरण बघून चैतन्य आल, आणि भराभर कामाला लागलो. काही जणांनी बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळच्या शंकराच्या मंदिरासमोर रांगोळी रेखाटावी अस ठरलं, आणि आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. कुंकू, भंडारा, हिरवा असे मोजकेच रंग घेऊन अर्धवर्तुळात सुंदर रांगोळी रेखाटली. तिकडची रांगोळी पूर्ण होईपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती, मग विद्युतदाहिनीच्या परिसरातील सगळ्या झाडांभोवतालच्या पारांवर मांडलेल्या पणत्या लावायला आम्ही कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. अवघ्या काही क्षणात तिथला परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला. पणत्या लावून आम्ही सभामंडपात आलो, एव्हाना सुनील सरांची रांगोळी पूर्ण झाली होती, त्या चित्राला अनुसरून लिहिलेली कविता हृदयस्पर्शी वाटली. 
  
' वैकुंठमय मम देह जाहला 
 दशदिन आत्मा फिरत राहिला 
 काक स्पर्श हा जेव्हा घडला 
 सर्वांचाच मग जीव भांड्यात पडला 
 तिलांजलीही मग जाहली 
 ह्या आत्म्याला मुक्ती मिळाली ' 


                     रांगोळी आणि काव्य ह्यांचा सुरेख संगम डोळ्यात साठवत आम्ही आसनस्थ झालो आणि पुढील मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. एक एक करून कर्मचार्यांना बोलावून यथोचित सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगाचे औचित्त साधून आमंत्रित मान्यवर मंडळीनी कृतज्ञता व्यक्त केली.  उदय जोशी ह्यांनी सूत्रसंचालन केले, दररोजच्या जीवनात येणारे विविध प्रसंग सांगितले आणि अंगावर काटा आला त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या लोकांच कौतुक वाटल. 
  एकदा एका नुकत्याच बाळंतीण झालेल्या स्त्रीचा देह तेथे आण्यात आला होता, बरोबरच तिच्या नवजात अर्भकाचाही देह आणण्यात आला होता मात्र त्या बालकाच्या मृत्यूच प्रमाणपत्र नातलगांजवळ नव्हत तरीही तेथील कर्मचार्यांनी तो प्रसंग योग्य प्रकारे हाताळला हे ऐकून बर वाटल, अश्या प्रसंगात दुःखी नातलग हमरीतुमरीवर येतात आणि तरीही तेथील कर्मचारी अतिषय नम्रपणे, शांतपणे प्रसंग सांभाळून घेतात हे ऐकून त्या लोकांच कौतुक वाटल. कधी कोणी नेते कुठल्या अंत्ययात्रेबरोबर येतात आणि लवकर अंत्यविधीला घेण्यासाठी विनवणी करतात मात्र येथील कर्मचारी नियमांचं काटेकोरपणे पालन करतात आणि सामान्यांना योग्य तो न्याय देतात हे ऐकून वाटल, इथे तरी राजकारण चालत नाही हे समधानकारक आहे. कधी असाही प्रसंग येतो की देहाबरोबर केवळ एकच नातलग असतो अश्या वेळी हे कर्मचारी आपुलकीनी सगळ करतात, त्या नातलगाचा शोक आवरतात , त्याला धीर देतात, हे ऐकताना अंगावर काटा आला, कश्या आणि कोणत्या प्रसंगातून इथली काम करणारी मंडळी जात असतील हे समजल तेव्हा गदबदुन आल. रात्री अपरात्री आणलेल्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केवळ तेथील एका कुलकर्णी नावाच्या गृहस्थांनी ते विधी शिकून घेतलेत हे ऐकल तेव्हा वाटल किती हे समर्पण आणि किती ही कामावरची श्रद्धा. असे एक ना अनेक प्रसंग ऐकताना पुन्हा पुन्हा एकच भावना येत होती, हे कर्मचारी आहेत म्हणून आज मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. हे ह्या लोकांच समाजावर असलेल ऋणच आहे.  हे समाजऋण कधीच फिटणार नाही परंतु त्यासाठी राष्ट्रीय कला अकादमीचे  कार्यकर्ते योग्य पाऊल उचलत आहेत हे पाहून खरच धन्य वाटल. अश्या ह्या विचित्र परिस्थितीत कणखरपणे काम करणाऱ्या लोकांना देवदिवाळीच्या निम्मिताने दिलेला असा हा सन्मानाचा सोहळा डोळ्यात साठवत आम्ही समाधानाने परतलो. 


तेजश्री 


७/१२/२०१० 

No comments:

Post a Comment