Sunday, June 12, 2011

नवा दृष्टीकोन


आज सकाळी सकाळी घराच्या गच्चीवर मी गेले, नित्य सवईने झाडांना पाणी घालून झाल, फुल काढून झाली, पाणी घालताना त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या, घराच्या समोरच्या ढोलीतील पोपट बघून झाले, कावळ्यांना उचकवून झालं, कबुतरांच निरीक्षण करून झालं, मांजरीला वेडावून झालं, बुलबुल, मैना, घारी, चिमणी, रॉबिन, सनबर्ड  साऱ्या साऱ्यांची हजेरी घेऊन झाली आणि आता मी खाली निघणार एवढ्यात वरच्या एका तारेवर बसलेला पक्षी मला खुणावू लागला. चकाकणारा निळा रंग जाड लांब अशी चोच आणि पांढरी छाती खुप मजा वाटली. अरे हा तर खंड्या! उदगार आपसूक बाहेर पडले. पाणवठ्याजवळ आढळणारा हा पक्षी आज इथली वाट कशी चुकला हे बघून आश्चर्य वाटल पण त्याच बरोबर आपण तयार केलेल्या छोटूशा कुटुंबात सर्वप्रथम आल्याबद्दल खुप कौतुकही केल. तो बिच्रारा काहीही न बोलता  गप गुमान बसला होता, वाट चुकला होता की काय माहित नाही पण तो आज इथे आला हेच खुप भारी वाटल. जरास गावाच्या बाहेर गेलं की हमखास सापडणारा हा खंड्या लांब लांब उडत इकडे कुठे बर आला असेल असा विचार करत मी खाली आले. 
दिवसभरात कामामध्ये गढून गेल्यावर मी हे साफ विसरूनच गेले, मात्र आत्ता हे सगळ झरझर डोळ्यासमोर आल आणि वेगळ्याच गोष्टीची जाणीव झाली. वास्तविक मी लहान असताना घरच्या देवाला फुल मिळावीत ह्या स्वार्थी हेतून झाडं लावली, एक एक करत ती वाढवली,  फुलवली, जपली. हा हा म्हणता गच्ची पन्नास एक झाडांनी भरून गेली.  हळू हळू वेगवेगळे पक्षी, फुलपाखर येऊ लागली बागेत मनसोक्त खेळू लागली आणि जीव आपोआपच रमत गेला. चिमणिनी आणलेल्या काड्या किवा बुलबुलाने कुंडीतल्या इवल्याश्या कढीलिंबाच्या झाडावर घेतलेले झोके सनबर्डनी अखंड केलेला फडफडाट मन भारावून टाकत राहिला. निसर्ग, पक्षी, फुलपाखर आजपर्यंत खुप लांब दूरवर गावाच्या बाहेर बघितली होती, ती आता माझ्या घराचा, कुटुंबाचा भाग होत आहेत हे बघून खुप समाधान वाटल. अस वाटल अरे हेच, हेच तर हव होत आपल्याला, सगळा निसर्ग आपल्या जवळ असावा, सगळ्यांनी आपल्याशी बोलाव, सगळ्यांना हे आपलच घर वाटावं, मनसोक्त खेळावं. एक पराकोटीच समाधान मिळाल. धन्य वाटल. 

तेजश्री 
(२०.०१.११ )

एक दिवस जंगलातला


निळ तळ दूरवर पसरल होत, मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर नुकतीच नाहून निघालेली हिरवी गार पान पक्ष्यांच्या सुरेल गाण्याला सुरेख साद करत होती, मधेच एखाद पिकल पान वारयावर स्वार होत आरामात खाली उतरत होत, तळ्यात उतरलेल्या गुलमोहोराच्या पाकळ्या इवलुश्या नावेप्रमाणे पाण्यात आपल रूप न्याहाळत पांगल्या होत्या. नीळ आभाळ आपल प्रतिबिंब बघण्यासाठी हिरव्या कमलदलांशी  स्पर्धा करत होत, गुलाबी, पिवळी, निळी कमळे आपल्या तळ्यातल्या वास्तव्याची आठवण करून देत होती. हिरवेगार मखमली गालिचे तळ्याच्या दोहोबाजुनी फोफावावले होते, अधून मधून पिवळ्या, तांबड्या तृणफुलांचे ताटवे वर डोके काढून सूर्य किरणांना धिटाईने सामोरे जात होते. फुलांवर भिरभिरणार्या पिवळ्या, लाल, निळ्या फुलपाखरांना क्षणभरही थांबण्याची उसंत नव्ह्ती. एकमेकात गुंफलेल्या फांद्यांच्या औदुंबराखाली मी पोहोचले, तळ्याकाठच्या परिसरात थोडावेळ घालवल्यावर मी पलीकडच्या जंगलात जाण्यासाठी तळ्याच्या डाव्याबाजूच्या अरुंद पुलाजवळ आले. पुलावरून कसरत करत मी पलीकडे पोहोचले, गवत दोहोबाजुनी कंबरेच्या वरपर्यंत वाढल होत, हातातल्या वाळक्या काठीने ते बाजूला करत मी जंगलाची वाट धरली, समोरच्या वडाने आपले जवळजवळ शे दोनशे हात पाय जमिनीत घट्ट रोवले होते, अर्थात एवढ्या महाकाय वृक्षात अनेक जीव सामावले होते, असंख्य और्कीडस आपल्या हक्काच्या घरासारखी पाय पसरून बसली होती. एवढ्यात पाण्यातून सळसळत एक पाणसाप तळ्याच्या काठावर आला, सकाळच कोवळ उन्ह खायला आला असावा बहुतेक कारण त्या नंतर तो तिथेच ठिय्या मांडून बसला, पायापाशी झालेल्या हालचालीने माझ लक्ष बुटाकडे गेलं तर एक बेडूक माझ्या बुडाच्या लेसशी खेळत होता. माझ लक्ष गेल्यावर मात्र साहेबांनी तळ्याच्या दिशेने धूम ठोकली. मी जंगलाकडे निघाले समोरच्या उंच झाडाच्या ढोलीत दोन पोपट बसलेले मला दिसले. पोपटिण बहुदा आज दूरवर फिरायला जाण्याचा हट्ट आपल्या जोडीदाराकडे करत असावी, तीच पोटावर वाकून त्याच्याकडे बघण, मन वळवून विशिष्ठ आवाज करण आणि म पोपट राजी झाल्यावर पंख फडफडवून व्यक्त केलेला आनंद पाठोपाठ त्या दोघांच दूरवर उडत जाण ह्यातून मला तरी असाच बोध झाला, माणसात असतात तेच भाव पक्षातही असतात असं जाणवलं आणि मजा वाटली. टौक टौक असा आवाज कानी पडू लागला, नजर तांबट पक्ष्याला शोधू लागली, आणि त्या आधी बुलबुलांची जोडी नजरेस पडली. एका बुलबुलाच्या चोचीत कसलं तरी फळ होत. ड्रोन्गोरावांनी आपली उलट्या व्ही ची शेपटी हलवत आपली उपस्थिती दिली. पलीकडच्या झाडावर फुलांभोवती फुलचुख्या एकसंध लयीत पण खुप वेगाने पंखांची फडफड करत होत्या, एवढ्याश्या जीवाला दमण्याची चिंता, कल्पनाच नव्हती. एवढ्यात निळ्या रंगाने माझ लक्ष वेधून घेतलं, तोंडात मासा धरून खान्डोपंत बसले होते, दोनदा मासा हवेत उडवून त्यांनी तो मासा गिळंकृत केला आणि पुढला मासा पकडण्यासाठी त्यांनी तळ्याच्या दिशेने रवानगी केली. पंखावरल्या  चमचमणाऱ्या निळ्या रंगाने डोळ्याच पारण फिटलं. काळ्या तोंडाच्या वानरांची टोळी नुकतीच तिथून गेली असावी, कारण अर्धवट खाल्लेल्या फळांचा सडाच मला दिसला, आणि त्यातलं एक अर्धवट वयातल एक पिल्लू मागेच राहील होत, माझी हालचाल होतच त्यानेही उड्या मारत पाच पन्नास झाडं मागे टाकली. थोड आणखीन आत गेल्यावर नाचऱ्या पक्षांचा सामुहिक नाच सुरु होता, आपली शेपटी पंख्यासारखी फुलवून त्यांचा नृत्याविष्कार बघताना मला आफ्रिकन झुंबा नृत्याची आठवण झाली, त्यात नृत्यप्रकारात सुद्धा असंच खाली बघून स्वतःभोवती गिरकी घेण्याच्या काही स्टेप्स असतात. त्याचं नृत्य बघण्यात मी रमलेली असतानाच कोकीळचा सुरेल आवाज कानी पडला. मी इकडून ओरडून कोकिळेला साद घातल्यावर तिकडून  तो आणखीन जोराने ओरडत असे अशी जुगलबंदी बराच वेळ चालली, शेजारच्या एका झाडावर वेड्या राघूंचा जोडा दिसला. आता जंगल थोड विरळ झालं होत, खडकांवरून वाहत वाहत एक खळखळता झरा दिसला, झऱ्याच पाणी पीऊन मी तिकडे थोडा वेळ काढला. ढगांकडे सताड डोळ्यांनी बघत खडकांवर निवांत पहुडण्याचा आनंद काही औरच, झरयाच्या वर एका झाडाची फांदी आली होती, फांदीवर दोन पाकोळ्या बसल्या होत्या, आपल्या तारेसारख्या शेपट्या हलवत त्यांचा शो चालू होता, मग एकदा पंख फडफडुन झाले, खाली वाकून झालं, एकदा पुढून एकदा मागून सगळी प्रदर्शन झाली, झऱ्यात पाणी प्यायला वेगवेगळे पक्षी आले, पोंड हेरॉन, कारमोरंन्ट आले होते, शेजारच्या झाडाच्या ढोलीतून मैना डोकावत होत्या, आपल्या इवल्या इवल्या पिल्लांना भरवतानाच समाधान शब्दांपलीकडच होत. बरच भटकून झालं  होत एव्हाना उन्ह डोक्यावर आल होत, अजून आत आत जाताना बाहेर येताना संध्याकाळ झाली असती त्यामुळे तशीच माघारी फिरले. थोड्याच वेळात एक झकास पावसाची सर आली आणि चिंब भिजवून गेली, उन्हानी झालेली चिकचिक कमी झाली, खाटिक, मुनिया, हळद्या प्रीनिया सारखे पक्षी जाता जाता दर्शन देऊन गेले,  तळ्यापाशी पोहचेपर्यंत सायंकाळ झाली होती सांजवेळच्या किरणांनी परीसासारखी जादू केली होती सकाळी नीळ असलेल तळ्याच पाणी सोनेरी झालं होत. कुट, कोर्मोरंन्ट, पोंड हेरॉन अजूनही डुबक्या मारत होते, सगळ्यांना मुश्कीलीनी अलविदा करून प्रसन्न अनुभवांनी मी परतले....     

तेजश्री 

Sunday, June 5, 2011

नाण्याच्या दोन बाजू

नाण्याला दोन बाजू असतात, एक छापा एक काटा. एखादी गोष्ट चूक की बरोबर हे ठरवण्यासाठी किंवा आपल मत मांडण्यासाठी आपण ह्या नाण्याच उदाहरण हमखास देतो. असा एक सर्वमान्य समज आहे की ह्यातली एक बाजू बरोबर किंवा योग्य असते आणि दुसरी चूक अथवा अयोग्य. पण गेल्या काही दिवसात वेगळ्या वेगळ्या गोष्टी अश्या स्वरुपात समोर आल्या की माझ एक मत तयार झालंय, ते असं की दरवेळेसच हा नियम लागू होत नाही. नाण्याच्या दोन बाजू तर असतात पण त्यातली एक योग्य असते आणि दुसरी पण योग्यच असते. कोण ठरवत त्याची योग्यता? तर ती आपण माणसच, सदसदविवेक बुद्धीनी आपण हा निर्णय घेऊ शकतो आणि त्यावरून निकषही लावू शकतो. हा असा विचार जेव्हापासून माझ्या मनात आला तेव्हा पासून एक बदल तर नक्की झाला अन अशी जाणीव झाली की आपल्याला अपेक्षित असलेल समोरची व्यक्ती वागत नसेल किंवा अपेक्षित प्रतिक्रिया देत नसेल तर होणारी चिडचिड थोडी कमी झाली आणि ती व्यक्ती तसं वागण्यामागे योग्य असं काहीतरी कारण तर नक्की असणार ह्याची खात्री वाटू लागली. असं ढोबळ बोलण्यापेक्षा काही अनुभवच सांगते,
 आज पर्यावरण दिन, पर्यावरण जागृकतेवरच्या एका चर्चेत मी एक श्रोता म्हणून सहभागी झाले होते, आणि माझ दोनही बाजू योग्य असं शकतात हे मत अधिकच प्रबळ झालं. आपण दरवेळेस हेच ऐकतो की झाडं लावा झाडं जगवा आणि झाडं तोडू नका आणि पर्यावरण रक्षक तर झाडं न तोडण्यासाठी जीवाचा इतका आटापिटा करत असतात, तर ह्या चर्चेत एकूण चार लोक सहभागी होते त्या पैकी तिघांचं बोलून झालं आणि त्यांच्या मते झाडं लावली पाहिजेत ती तोडता कामा नयेत आणि त्यांच्याच बरोबर जे चौथे गृहस्थ होते त्याचं मात्र जरा चमत्कारीकच मत होत. चमत्कारिक अश्यासाठी म्हणल कारण असा विचार मी तरी ह्या पूर्वी कधीही केला नव्हता आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा विचार वाटला. ते एक आर्कीटेक्चर होते आणि त्यांच्या मते घर बांधताना आपण लाकडाचा वापर अधिक करायला हवा.... आश्चर्य  वाटल ना... पण ह्या वर त्यानी जो खुलासा दिला  तेव्हा त्याचं म्हणण अंशतः का होईना पटल, नाहीतर इतर वेळेस असं बोलणाऱ्या माणसाला मी वेड्यात काढल असत आणि कदाचित पुढच काहीही ऐकून पण नसत घेतलं... पण त्या गृहस्थांच्या मते आपण सध्या घरबांधणी करताना स्टीलचा वापर करतो, स्टील साठी लागणार लोखंड आणि इतर गोष्टी आपण खाणीतून काढतो, बर ह्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा वापरत नाही, म्हणजे रिसायकल करत नाही, तेव्हा पुढे जाऊन खाणीतील खनिजे जेव्हा संपुष्टात येतील तेव्हा आपण काय करणार? त्यांची निर्मिती आपण माणस तर करूच शकत नाही, ह्या उलट लाकूड ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रयत्नांनी निर्मित करू शकतो, ते म्हणजे झाडं लावून, तेव्हा स्टील किवा तत्सम खनिजांचा वापर टाळून आपण लाकडाच्या वापरावर अधिक भर द्यायला हवा, म्हटल तर ही बाजू अतिषय योग्य आहे, खरोखर प्रयत्न करून आपण झाडं लावून लाकुडनिर्मिती करून शकतो पण दुर्दैवानी आज झाडं तोडण्याची संख्या आणि लावण्याची संख्या आणि झाडं वाढून वृक्ष होऊन त्याची लाकड वापरात येऊ शकतील ह्याला लागणारा कालावधी ह्याचा ताळमेळ काही बसत नाही आणि ही गोष्ट अशक्यप्राय भासू लागते..... 
आणखीन एक उदाहरण म्हणजे एअर कन्डीशनरचा वाढता वापर, आता ह्याचा वापर करु नये कारण त्याने ग्लोबल वार्मिंग वगेरे होत हे तर आपल्याला माहीतच आहे त्यावर पुरेशी चर्चा आपल्या कानावर पडलेलीच असेल आपणही त्यावर पुरेसा चोथा होईपर्यत चर्चा केली असेल पण जर मी म्हणाले त्याचा वापर गरजेचा आहे तर.... आश्चर्य वाटेल कदाचित पण त्याला जोडून मी जर काही खुलासा केला तर कदाचित आपल्याला हे पटू शकेल... मी सध्या जिथे काम करते त्या प्रयोगशाळेत काही किमती अशी यंत्रे आहेत आणि ती सुरळीत चालवण्यासाठी तापमान हा एक प्रमुख घटक आहे आणि त्यासाठी  एअर कन्डीशनरचा वापर अत्यावश्यकच आहे, म्हणजे मी अत्यावश्यकच मध्ये च वर एवढा भर देते आहे त्यामागे असं कारण आहे, एकदा असच मी खुप थंडी वाजते म्हणून २६ अंश तापमान बदलून २७ केल आणि मग निश्चिंतपणे एक यंत्र वापरायला सुरवात केली. यंत्र सुरु केल्यावर त्याच कॅलीब्रेशन करण हा एक महत्वाचा भाग असतो आणि तेव्हा असं लक्षात आल ते तापमान १ अंशांनी वाढवल्यामुळे ते यंत्र कॅलीब्रेशन फेल्यूअर झाल्याच दाखवत होत. मला त्या खोलीच तापमान पुन्हा पूर्ववत होई पर्यंत थांबाव लागल... आणि एक वेगळा धडा मिळाला
काही दिवसांपूर्वी माझ्या भाचीला तेलमालिश करून अंघोळ घालायला एक मावशी येत असत, त्यांचा पहिलाच दिवस होता तेव्हा त्यानी तिला अंघोळ घालताना तिचे तोंड साफ केल नाही तर साहजिक त्यानंतर असा विषय झाला तेव्हा मी वहिनीला म्हटल की त्यांना सांगायला हव की तीच तोंड आतून साफ करत जा, आपल्याला हव तसं काम आपण करून घ्यावा लागत ... त्याचं त्याचं ते स्वतःच्या मनानी नाही करु शकत... वगेरे वगेरे आणि म थोडावेळ झाला, बाबा आले आणि त्यांना सहज मी हे सगळ सांगत होते की त्या मावशीनी तोंड नाही साफ केल पण बाकी व्यवस्थित घातली अंघोळ... त्यावर बाबा म्हणाले नाही केल तेच बर झालं... अरे? बरोबर माझ्या विरुद्ध मत? पण का? मी प्रश्न विचारायच्या आताच ते उतरले... कस आहे, त्या मावशी कुठून येतात आणि त्यांचे हात किती साफ असतात काय माहित... आपण हात धुवायला लावू सुद्धा एकवेळ पण   त्यांची नख?... त्यात अडकलेला मळ... त्यानी जर काही जखम झाली तर? त्यापेक्षा नकोच... खर तर होत त्याचं म्हणण
असच एकदा मी रस्त्याच्या कडेला एका ताईंबरोबर उभी होते एक दहा बारा वर्षाची मुलगी जवळ जवळ पळतच आली आणि आमच्यासमोरच्या रिक्षात शिरण्यासाठी तिच्या पाच सहा वर्षाच्या छोट्या बहिणीला गळ घालू लागली... पाठीमागून त्यांची आज्जी येत होती... छोटी बहिण आज्जी यायच्या आत आपण बसलो तर आज्जी मागेच राहील ह्या भावानेनी कावरी बावरी झाली होती तिला काय कराव काही सुचत नव्हत, एकदा पुढे तिच्या ताईकडे आणि एकदा मागे आज्जीकडे बघत ती रिक्षाजवळ आली ... अखेर ताईने खूपच गळ घातली किंवा जवळजवळ ताईगिरी केली म्हणून ती आत चढली... त्या मोठ्या ताईनी रिक्षावाल्यांना पत्ता सांगितला आणि एवढ्यात त्या दोन बालीकांची आज्जी तिथे आली आणि जोरात त्या दोघींना ओरडली.... तुम्हाला घाई करायला कोणी सांगितलेली मी येईपर्यंत सुद्धा तुम्हाला दम निघत नव्हता का? म्हटल तर अगदी बरोबर होत आज्जींच आजकाल कुणाची खात्री राहिली आहे? समजा त्या आज्जी यायच्या आधी रिक्षावाल्यांनी त्यांना नेल असत... तर? कदाचित हीच भीती त्या आज्जीना  वाटली असावी आणि त्याच काळजीपायी त्या तसं बोलून गेल्या... रिक्षा गेली आणि मग मला ताई म्हणाल्या किती चुकीच वागल्या ह्या आज्जी... त्या मुलीनी एवढी छान रिक्षा थांबवली आणि किती व्यवस्थित पत्ता सांगितला तिने  तेव्हा तीच कौतुक करायचं तर असं बोलून त्यांनी त्या मुलीचा आत्मविश्वास कमी केला ... मुलांच्या मानसिकतेवर ताईंचा अभ्यास होता त्यामुळे त्या अधिक खात्रीपूर्वक सांगत होत्या अश्या प्रसंगांमुळे निरागस बालमने दुखावतात आणि पुढच्यावेळेस आपण एखादी गोष्ट करू शकतो हा स्वतःवरचा विश्वासच ते विसरून जातात आणि जी खुप गंभीर बाब होऊ शकते...       
अशी एक ना अनेक उदाहरणे घडतात आणि नाण्याच्या दोन्ही बाजू योग्य भासतात....  

तेजश्री 
०५.०६.२०११