Friday, October 28, 2011

दिपावली

                  दिपावली म्हणजे दिव्यांचा उस्तव... नात्यांचा सण ! दिवाळीच औचित्य साधून घरादारात, रस्त्यांवर, उद्यानात, पारंपारिक वास्तुत, सार्वजनिक स्थळांमध्ये हजारो दिवे लावून दिपोस्तव साजरा केला जातो. नात्यातला ओलावा टिकून राहण्यासाठी दिवाळी एक हक्काचा उत्सव. 
दिवाळी म्हणजे धमाल,
दिवाळी म्हणजे फराळ  
दिवाळी म्हणजे रोशनाई, 
दिवाळी म्हणजे आप्तेष्टांच्या भेटीगाठी
दिवाळी म्हणजे भेटवस्तू, मिठायांची देवाणघेवाण, 
दिवाळी म्हणजे शुभेच्छापत्र, रांगोळ्या अन अभ्यंगस्नान
दिवाळीचा महोत्सव खरच काही खास असतो, नेत्रदीपक चैतन्यदायी असे वातावरण असत,  ऑक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान येणारा हा उस्तव सात दिवसांचा...पण त्यातले चार दिवस अधिक जल्लोषात साजरे केले जातात, हरेक दिवसाच आगळ वेगळ महत्व.
                 अश्विन कृ. एकादशी म्हणजेच रमा एकादशीला पहिला दिवा लावण्याची अगदी जुनी प्रथा,
दुसरा दिवस म्हणजे द्वादशीचा म्हणजेच वासुबारसेचा, ह्या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, सवाष्णी गोमातेला गोडधोडाचा नैवेद्य दाखवतात, मग गोमातेला वंदन करून पुढील सुखकर आयुष्यासाठी आशीर्वाद मागितले जातात. गोमातेमध्ये तेहतीस कोटी देव सामावले असल्याची श्रद्धा असल्याने गोमातेला केलेले वंदन थेट तेहतीस कोटी देवांपाशी पोहोचते असे मानतात.
त्या नंतर येते ती धनत्रयोदशी , ह्यादिवशी देवांचे वैद्य 'धन्वंतरी' ह्यांची पूजा होते. ह्यादिवाशीच यमदीपदान असते. यमासाठी कणकेचा दिवा लावला जातो. यमाची दिशा 'दक्षिण' म्हणून हा दिवा दक्षिणेला ज्योत येईल अश्या पद्धतीने ठेवला जातो.
                 दुसऱ्या दिवशी येते ती नरकचर्तुदशी, हीच दिवाळी पहाट! अशी दंत कथा आहे की ह्या दिवशी जो सूर्योदयानंतर उठेल किंवा स्नान करेल तो नरकात जाईल. वास्तविक स्वर्ग, नरक ह्या सर्व कल्पना माणसाच्याच पण काही का असेना दिवाळीच्या पहाटे पहाटे उठून आईकडून सुगंधित तेल, उटन लावून घ्यायच आणि मग कढत्या पाण्याने स्नान! वाह !!!! दिवालीका मजाही कुछ और है! दिवाळी पहाटे  नवीन नवीन कपडे घालून घर पणत्यांनी भरून टाकायचं.. त्यानंतरच  देवदर्शन, कुटुंबासमवेत यथेच्छ फराळ, गप्पा टप्पा जवाब नही!
              नंतरच्या दिवशी म्हणजे अमावस्येला लक्ष्मीपूजन, लक्ष्मी घरी नांदावी म्हणून तिची पूजा केली जाते.
             त्यानंतरचा दिवस म्हणजे कार्तिक शु. प्रतिपदा, बलिप्रतिपदा किंवा  पाडवा नवीन जोडप्यातील नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी आणि जुन्यांमधला आहे तसाच टिकवण्यासाठीचा खास दिवस! ह्यादिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. दुकानदारांसाठी हा वर्षाचा पहिला दिवस असतो. त्यांच्या जमाखर्चाच्या वहीची पूजा आदल्या दिवशी केली जाते. बळी राजा ह्याच दिवशी दैत्यांवर विजय मिळवून परतला होता त्यामुळे ह्या दिवशी बळी राजाचेही स्मरण केले जाते.
             त्या नंतर येते यमद्वितीया किंवा भाऊबीज , भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिच्या कडून ओवाळून घेतो, अस म्हणतात ह्या दिवशी यमही त्याच्या बहिणीकडे यमिकडे जाऊन ओवाळून घेतो.
ह्या चारही दिवसातले खरे सार, आणि आकर्षणाचा विषय म्हणजे दिवे... पणत्या, आकाशदिवे, इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लावून जमीन, आकाश उजळवून टाकले जाते. दिवाळीची रोशनाई नेत्रदीपक असते, ह्या चार दिवसातलं आणखीन एक आकर्षण म्हणजे आतिषबाजी, आणि फटाके...तस असल तरी आजकाल मात्र सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनी फटाके फोडण्याचे टाळले जाते...

             नुकती थंडी सुरु झालेली असते आणि त्यात दिव्याची उब घरादारात रेंगाळते.... 

वेगवेगळ्या आकाराच्या पणत्या निवडून निवडून आणायच्या आणि विविध रंगांनी घरी स्वतःच रंगवून आदल्या रविवारीच तयार ठेवण्याच काम अगदी आवडीच! अशी वेगवेगळी सजावट करून घरासमोर पणत्या ठेवून घरगुती दीपोत्सव दरवर्षीचाच....

सार्वजनिक ठिकाणी सुद्धा हजारो दिवे लावून दिवाळीचे जल्लोषात स्वागत होते.

                 पणत्यांबरोबरच आकाशदिवे लावून दिवाळीच स्वागत केल जात. बाजारात अनेक आकाराचे आकाशदिवे मिळत असले तरी घरी आकाशकंदील स्वतः करण्याची मजा काही वेगळीच.....शिवाय कल्पना शक्तीला आणि कलाकौशल्याला वाव...


ह्या वर्षी मी असा कमळाच्या आकाराचा आकाशदिवा बनवला होता.

दिवाळीच आणि रांगोळीच नात अगदी जुनंच बरका! दिवाळीच्या निम्मिताने घरासमोर, देवळात, आणि सार्वजनिक जागी लहान, मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेरची रांगोळी हे संस्काराच प्रतिक मानल जात, रांगोळीतले रंग घरातील सुख समृद्धीची जाणीव करून देतात.


मी ही पाच बोटांची रांगोळी गच्चीत दिवाळी पहाटे  काढली होती, प्रथमच अगदी आखणीपासून रंग भरून त्यावर रांगोळी काढण्याच काम एकटीने केल होत, खूप मजा आली...


मी रांगोळी काढताना ....


देवळासमोरची रांगोळी .....



पाच बोटांची रांगोळी कितीही आकर्षक असली तरी घरासामोरमात्र ठीपक्यांचीच रांगोळी...
ऐनवेळी सुचेल तशी रांगोळी काढत गेले...


आणखीन एक ठिपक्याची रांगोळी



पाच बोटांच्या रांगोळीच कौशल्य रांगोळीची रेघ न चुकवण्यात तर ठिपक्यांच्या रांगोळीच, रांगोळीची रेघ रंगानी न पुसून देण्यात, दोन्ही रांगोळ्यांच सौंदर्य रंगानी वाढत त्यामुळे रंगसंगती सर्वात महत्वाची, पाच बोटांच्या रांगोळीत आधी रंग भरून मग त्यावर रांगोळी रेखाटली जाते, ह्यात मुक्तहस्ते रांगोळी रेखाटली जाते, तर ठिपक्यांच्या रांगोळीत आधी बाह्यरेषा निश्चित केल्या जातात आणि मग त्यात रंग भरले जातात. पाच बोटांची रांगोळी आजुबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेऊनही मुक्तपणे जगायला शिकवते तर ठिपक्यांची रांगोळी मर्यादेत राहूनही सुंदर जगायला शिकवते.  
बाजारात कितीही छान छान भेटकार्ड मिळत असली तरी आप्तेष्ट, नातलगां देण्यासाठी स्वतःच्या हाताने बनवलेल्या अश्या शुभेच्छा पत्रकात काही वेगळच प्रेम असत,


पेपर क्विलिंग पासून बनवलेलं भेटकार्ड

चार दिवस दिवाळीचे कसे गेले कळालच नाही पण यंदाची दिवाळी आठवणीत मात्र कायमच जागी राहील....

तेजश्री
२९.१०.२०११