Wednesday, May 4, 2011

काकड आरती




कोजागिरी पौर्णिमा अत्यंत साध्या, घरगुती पद्धतीने साजरी केल्यावर आजचा काकड आरतीचा अनुभव लाजवाब होता. मुरलीधराच्या मंदिरात काकड आरतीला उपस्थित राहण्याचा प्रस्ताव कुणी मांडला आणि त्याक्षणीच मी होकार दिला. पाहटे साडे चारला उढून शुचिर्भूत होऊन पाच वाजता आम्ही घर सोडलं. जस जसे मुरलीधराचे मंदिर जवळ येऊ लागले तसे चौघड्याचे आवाज कानी येऊ लागले. देवळाबाहेर रेखाटलेली रांगोळी बघून मन प्रसंन झाले अन आम्ही देवळात प्रवेश केला. विविध वयोगटातले स्त्री पुरुष येत होते काही आधीच उपस्थित होते. काही स्त्रिया दिवा लाऊन नैवेद्य दाखवत होत्या, मग काकुनेही बरोबर आणलेला लोणी साखरेचा नैवेद्य कृष्णासमोर ठेवला, नटखट माखनचोर कृष्णाला ह्या पेक्षा सरस कोणता नैवेद्य असू शकतो असा विचार करत मी समाधानाने वंदन केले. तेवढ्यात पुजारी आले त्यानी गाभार्याच दार उघडल आणि कृष्ण राधेची द्विभुज , मानवरूपी मूर्ती आणखीन स्पष्ट दिसू लागली. गडद गुलाबी रंगाचा वेश धारण केलेला 'मुरली' धर खूपच मोहक दिसत होता मला त्याच्या मोहन ह्या नावाची अचूक प्रचीती आली. कृष्णाच्या वाम अंगाला राधा आणि चरणापासच्या दोन गाईनाही सारख्याच रंगाचा वेश होता. काकड आरती म्हणजेच काकडा हि देवाला जाग करण्यासाठी म्हणलेली प्रार्थना. अश्विन पौर्णिमेला सर्वप्रथम विठठलाच्या देवळात हा काकडा होतो त्या नंतरच्या दिवशी म्हणजे कालपासून इतर देवळातही ह्याला सुरवात होते. हि काकडारती पुढे महिनाभर रोज केली जाते. अतिषय पारंपारिक पद्धतीने शंखनाद करून ह्याला सुरवात झाली. सर्वप्रथम अत्योच्च स्वरात भूपाळू म्हणून देवाला उठवण्याचा कार्यक्रम झाला गाभाऱ्यात एक गुरुजी मंद लईत निरंजन ओवाळत होते. बाहेरच्या प्रशस्त मंडपात पुढे पुरुष आणि मागे स्त्रिया उभ्या राहून देवाला उठवण्यासाठी आर्जवत होत्या. भूपाळी पाठोपाठच काकड आरत्या सुरु झाल्या एका पाठोपाठ एक सात ते आठ आरत्या म्हणल्या. आपल्या भारदस्त आवाजात एक वयस्कर गुरुजींनी जेव्हा आरत्यांना सुरवात केली तेव्हा माझ्या मनात सहज एक विचार आला एवढ्या उच्च स्वरातल्या अर्जवता ऐकून कोणता देव उठणार नाही? टाळ, झांजा इ. वेगवेगळ्या वाद्यांनी टाळ धरला आणि मी तल्लीन झाले. एका लईत म्हटलेल्या त्या आरत्या प्रसन्न करणाऱ्या होत्या. हरेक नविन अर्तीचीची सुरुवात शंखनादाने झाली. एव्हाना गाभार्यातल्या गुरुजींनी निरांजन ठेऊन उदबत्ती घेतली होती. मंद लइत ओवाळली जाणारी उदबत्ती आणि तिचा दरवळणारा सुगंध मनमोहक होता. एक एक लोक येत होती आजूबाजूला राहणरी लोक विशेष उपस्थित होती. मुरलीधराच्या मंदिरातली ह्या वर्षीची हि पहिलीच काकड आरती असल्याने उस्ताह ओसंडून वाहत होता. विजेच्या दिव्या उजलेल्या राधा कृष्णाच्या मूर्तीला डोळ्यात साठवत आरतीची सांगता झाली. प्रदक्षिणा घालून तुळशीला नमस्कार करून आम्ही पुन्हा मंडपात आलो. कृष्णमूर्तीच्या बरोबर समोर अजून एक मंदिर आहे गरुडाच, विष्णूचे वाहन गरुद्रजालाही वंदन करून आम्ही निघालो डोळ्यात एक नविन अनुभव आणि मनात समाधान घेऊन. अश्या काकड आरतीचा आनंददायी अनुभव तुम्हीही जरूर घ्या

तेजश्री 

No comments:

Post a Comment