Thursday, May 10, 2012

ग्रीष्म


वेडी वाकडी वळण घेत, कधी उड्या मारत, कधी संथपणे, कधी अरुंद पोकळीतून जागा काढत तर कधी राजरोस पणे पाय पसरून नजरेत बसेल एवढा परिसर कब्जात घेऊन जाणारी ती नदी असंख्य जीवांना आश्रय देत होती. रंगीबेरंगी मासे, कासवे, सुसरी, मगरी, लव्हाळी, कमळे, झालंच तर घटपर्णी आदि जीव अगदी मजेने राहत. बगळे, पाणबगळे, पोंड हेरॉन, खंड्या, बंड्या, पाकोळ्या, वेडा राघू, टीबुकल्या, वारकरी बदक, सी इगल, आणि कर्कश्य ओरडून शत्रूची उपस्थिती अवघ्या परिसरातील पक्षांना करून देणाऱ्या टिटव्या, आणि इतर असंख्य पक्षी अगदी मजेत राहत  होते. 
वसंत सरला आणि ग्रीष्माने घामाच्या धारा काढायला सुरवात केली, कुठे सावलीला ढग येई आशा लावे आणि तसाच निघून जाई. नदीकिनार्यावरच्या गुलमोहराने लाल चुटूक शेला पांघरला होता, पान गाळून फक्त फुलांनी झाडाला नटवले होते, जवळचा पांगाराही वाऱ्यासंगे ठुमकत होता, पिवळ्या धमक लडी लडिवाळ पणे पुढे मागे करत, ऐन तारुण्यात आलेला पांगारा खुलला होता. पोक्त पिंपळ, गुलमोहोर, पांगारा, पळस, नीलमोहोर ह्यांच्यात सौंदर्याची स्पर्धा चालली होती, प्रत्येक जण आपल रूप नदीत बघून भारी खुश होत होता. ग्रीष्माची धगधगता वातावरणात होतीच आणि ती गुलमोहोर, पांगारा, पळसाच्या मध्ये शोषली जात  होती म्हणूनच कदाचित इतके आकर्षक रंग आले होते, पण सारेच एवढे थोर की आश्रयास आलेल्यास मात्र केवळ शीतल छायाच मिळे, उन्हाची एक झळही पांथरास बसत नसे. 
नदीच पाणी आटू लागल होत, पाण्याची पातळी चांगलीच खाली गेली होती.  दुरून आश्रयास आलेले पशु पक्षी झाडांवर गर्दी करत होते, प्यायला पाणी, राहायला निवारा आणि खायला अन्न सारच तोकड पडत होत, काही निराश होऊन पंखात पुरेस बळ नसताना पुढच्या प्रवासास निघत, थकत, दमत, विश्रांती घेत, चार मिळतील तेवढे घास पोटात ढकलत आणि पुढे जात. पण त्यांच्या त्यांच्यात कसली चढाओढ  नव्हती, एकमेकांवर रोष नव्हता, उलट निसर्गाचे पांग ते एकजुटीने आनंदात फेडत होते, त्यांची देहबोली आनंदी, उस्ताही, आशादायी होती. ते भाग्याला दोष देत बसत नव्हते.  निसर्गातून शिकायला बरच काही मिळाल. ग्रीष्मान नवं चैतन्य निर्माण केल .....



तेजश्री 
१०.०५.२०१२