Sunday, May 22, 2011

शाळा


     आज खुप दिवसांनी शाळा बघितली आणि आपसूक शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या , शाळेतले ते दिवस खूपच छान होते. एक स्वतःच विश्व होत, कसला फारसा ताण नाही, फारस कसलं बंधन नाही... मुक्त दिवस होते... आणि म्हणूनच कदाचित ते मुक्त पाखरासारखे उडूनही गेले. 
     मी साधारण आठवीत असेन, शाळेकडून आंतरशालेय स्पर्धेत घोषपथकात माझी निवड झाली होती. साधारण आठ ड्रम, एक ढोल, दोन झांजा आणि सोळा बासरीवादक आणि अर्थात आमची म्होरकीण, स्टाफधारक असे आम्ही अठ्ठावीस जणी होतो.  मी बासरी वादकांपैकी एक होते. साधारण तीन एक महिन्यात आम्ही सर्वप्रथम सा रे ग म वाजवायला शिकलो आणि लागलीच वेगवेगळे  राग, गाण्यांचे अचूक सूर आम्ही बासरीतून काढू लागलो. बासरी वादनातल्या  खुबी सांगायला प्रशिक्षक होतेच. आम्ही स्पर्धेची तयारी चालू केली होती, स्पर्धेच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या नविन नविन रचना करून पाहत शेवटी आम्ही आठ रचना पक्क्या केल्या. 
     स्पर्धेचा दिवस उजाडला, सकाळी लवकरच आवरून शाळेत दाखल झालो, आम्हाला न्यायला एक टेम्पो आला होता, स्पर्धेच ठिकाण शाळेपासून बऱ्यापैकी दूर होत. शाळेनी दिलेला चहा नाश्ता घेतला आणि वाद्य टेम्पो टाकत एक एक करून आम्ही टेम्पोत घुसलो. गणपतीचे नाव घेऊन आम्ही निघालो. स्पर्धेच्या ठिकाणी आम्ही पोहचलो, वेगवेगळ्या शाळेच्या मुली आल्या होत्या. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी,  मैदान भरलं होत. नउच्या ठोक्याला स्पर्धा सुरु झाली, एक एक करून संघ येऊन आपलं   कौशल्य दाखवू लागले. शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आम्ही आखून दिलेल्या चौकोनात प्रवेश केला, स्पर्धेचे नियम पाळत आम्ही आमच कौशल्य दाखवायला सुरुवात केली. पहिल्या बारा मिनिटात सात रचना पूर्ण झाल्या, आमच्या प्रतिनिधीनी एकूण तीन वेळा स्टाफ हवेत उडवून झेलला होता,  स्टाफ जितके जास्त वेळा उडवला जाईल तितके आधी गुण खात्यावर जमा होतात, तसेच जर तो स्टाफ चुकून खाली पडला तर ती शाळा स्पर्धेतून तीन वर्षाकरता बाद होते. मनात उगाच धाकधूक होती, पण सगळ व्यवस्थित पार पडल, सातवी रचना बदलून आम्ही शेवटच्या रचनेत आलो, शेवटच गाण वाजवयला सुरवात केली, आणि बरोबर चौदाव्या मिनिटाला आम्ही आखून दिलेल्या चौकोनाबाहेर पडलो. स्पर्धा संपल्यावर बरोबर आलेल्या प्रशिक्षकांनी आम्हाला शाळेत जाण्याचा सल्ला दिला आणि आम्ही निकाल काय लागेल ह्याची उस्तुकता मनात ठेऊनच , शाळेत परतलो, साधारण आपल सादरीकरण कस झालंय ह्याची प्रत्येकालाच जाणीव होती त्यामुळे आपण नक्की जिंकूच अशी आम्हाला खात्री होती. असं म्हणतात ना You yourself are a good judge. आम्ही ठरवून टाकल होत आमचा विजय नक्की... आम्ही न राहवून येतानाच आरोळ्या द्यायला सुरवात केली ... शाळेच्या नावाची कीर्ती शहरभर पसरवायला आम्ही मागे पुढे बघितलाच नाही ... आम्ही शाळेत आलो आणि मुख्याध्यापिकांनी आम्हाला बोलावून घेतलं.. निकाल लागलेला नसताना तुम्ही कशासाठी आरोळ्या दिल्यात ह्या वरून आम्हाला खुप ओरडा बसला.. पुन्हा उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली... आता जर आपण नाही जिंकलो तर? अजून ओरडा बसेल... आणि मोठा पोपट होईल तो तर वेगळाच... 
पुढचा अर्धातास आम्ही द्विधा मनस्थितीत आपण जिंकू की न जिंकू... निकालीची उस्तुकता शिगेला पोहचली होती. अर्ध्यातासानी प्रशिक्षक निकालाची बातमी घेऊन आले.. तृतीय क्रमांकांनी आम्ही जिंकलो होतो... आनंदाला सीमाच उरली नव्हती... प्रचंड जल्लोषात आम्ही शाळा दणाणून सोडली...घोष वादन करून आम्ही आमचं आनंद व्यक्त केला... शाळेच्या नावाच्या आरोळ्या जोरजोरात म्हणत आम्ही शाळा दणाणून सोडली... त्या आरोळ्या, ते शिक्षकांचे आणि शाळा मैत्रिणींचे कौतुकाचे चेहरे आजही लख्ख समोर आहेत...
        असे अनेक प्रसंग आठवतात... मी दहावीत असेन सहामाही परीक्षा झाली होती दिवाळी नंतर आम्ही शाळेत आलो... खुप बोर झालेले त्या दिवशी बाकावर शेजारी कोणीच नव्हत... गणिताचा तास चालू होता... आणि पानसे बाई खुप बोर काहीतरी सांगत होत्या मी खिडकीतून बाहेर  बघत होते ... बाईनी हे बरोबर हेरल... आणि मला उभ केल... काय चालू आहे तेजश्री? मी गप्प ... तोंडातून आवाजच फुटत नव्हता... थांब तुमच्या वर्गशिक्षिकेलाच सांगते..तापकीरच आहे ना वर्गशिक्षिका? .. नाहीतर आता तुमचे सहामाहीचे गुण कळल्यावरच बोलूयात आपण... असं म्हणत बाईनी पुढच शिकवायला सुरवात केली
          दुसर्यादिवशी पहिल्याच तासाला गुणपत्रिका मिळाल्या , गणित आणि शास्त्र विषयात सर्वाधिक गुण मलाच होते, गणित आणि शास्त्र दोन्ही विषय खुप लाडके असल्याने असे अव्वल गुण मिळण माझ्यासाठी नविन नव्हतच त्यामुळे मला काही आश्चर्य नव्हत वाटत पण अर्थात आनंद तर झालाच होता, तास संपला... दुसरा तास गणिताचाच होता, पानसे बाई आल्या, वर्गातली कुजबुज ऐकून आम्हाला त्यानी विचारलं काय मिळाल्या का गुणपत्रिका ? कुणाला सर्वाधिक गुण मिळाले ? माझ लक्षच नव्हत मी कसलतरी गणित सोडवत बसले होते... सगळ्यानी माझ नाव घेताच मी गडबडले बाई समोर उभी राहिले.. मला सर्वाधिक गुण मिळालेत बघून बाई अवाकच झाल्या होत्या त्यांच्या तोंडचे उद्गार अजून आठवतात... ' तेजश्री तुला सर्वाधिक गुण आहेत! ...आता तु बाहेर बघ, शिकवताना लक्ष दे किवा नको देऊ... मी काहीही बोलणार नाही तुला' ... आज ते वाक्य आठवलं की खुप हसू येत... 
         मी चौथीत असतानाची गोष्ट रांगोळीची स्पर्धा होती एक फुट बाय एक फुट अश्या चौकोनात रांगोळी काढायची होती... रांगोळी कधी हातात सुद्धा धरली नव्हती... माझ्या मैत्रिणीनी स्नेहलनी  माझं नाव देऊनही टाकल रांगोळीसाठी... आणि मी तुला शिकवीन रांगोळी कशी काढायची म्हणून अशी हमीही दिली .. मी निर्धास्त झाले... तिने शिकवलेल्या ७ ते ३ ठीपक्याच्या रांगोळीची मी खुप मनापासून तयारी केली, घरी येऊन बाबांच्या मदतीने कुठे कोणते रंग भरायचे ते ही ठरवलं... शनिवारी सकाळची शाळा झाल्यावर दुपारी स्पर्धा होती... सभागृहात खुप गर्दी होती सगळ्या मैत्रिणीच होत्या पण खुप छान छान रांगोळी काढणाऱ्या मला रांगोळी शिकवलेली स्नेहलही होती... सभागृहाच्या मध्यभागी एक मुलगी संस्कारभारतीची खुप मोठी रांगोळी काढत होती, वाटल अरे आपल्याला जो नियम सांगितलेला एक फुट बाय एक फुट त्याच काय झालं? मला उगाच न्युनगन्ड वाटू लागला  शेजारच्या एका मैत्रिणीला तिची आई रंग कसे भर ते सांगत होती...  वाटल अरे आपण पण आणायला हव होत का कुणाला... पण ही तर फसवणूक झाली... स्पर्धेत कशी काय मदत करतात पालक... मी दुर्लक्ष केल... आनंद मिळवण्यासाठी मी भाग घेतलेला जिंकन वगेरे फारच दुरची गोष्ट होती... बाहेर पाऊस पाडत होता माझा दादा घ्यायला आला ... मी कौतुकाने त्याला माझी रांगोळी दाखवली... आणि नंतर आम्ही घरी आलो .... मी विसरूनही गेले स्पर्धा वगेरे ... दुसऱ्या दिवशी सकाळ मध्ये बातमी तेजश्री पावसकरला तृतीय क्रमांक... मला आश्चर्यच वाटल... मला रांगोळी शिकवलेल्या  मैत्रिणीला किवा सभागृहाच्या मध्यभागी रांगोळी काढणाऱ्या त्या मैत्रिणीला बक्षीस नव्हत..नवल वाटल  परीक्षकांनी माझी रांगोळी बक्षीसासाठी निवडली होती... फार भारी वाटत होत होत.... प्रथम क्रमांक माझ्या शेजारी असलेल्या मैत्रिणीला जिची आई तिला मदत करत होती तिला मिळाला होता... फसवणूक केलेल्या मुलीला का बर प्रथम क्रमांक मिळाला असेल वाईट वाटल... काहीही असो मी सगळ्यात प्रथम रांगोळी काढली होती आणि मला बक्षीस मिळाल्याने माझा हुरूप तरी नक्की वाढला होता... न्यूनगंड गेला होता...पुढे जाऊन मी खुप रांगोळ्या काढल्या मला रांगोळी काढायचा नादाच लागला... आजही मी पाच बोटांची  रांगोळी शिकते आहे त्यासाठीची गोडी, आवड मला त्या रांगोळीस्पर्धेनी दिली... आणि हो आज तो तेव्हाचा माझ नाव छापून आलेला सकाळ पेपर बघितला की खुप छान वाटत.. ते शाळेतले दिवस पुन्हा यावेत असच वाटत ...                


तेजश्री 

Wednesday, May 4, 2011

दृष्टी



साधारण वेळ सायंकाळी पावणे सहाची असेल, नदीकाठालगतच्या रस्त्यावरून गाडीवरून मी जात होते.  पश्चिमेचा सुर्य बरोबर डोक्यावरून पुढे किरणे फेकीत होता. उजवीकडे नदी होती जी की अज्जीबातच बघण्यासारखी नसल्याने मी डावीकडची झाडे बघत होते. सुर्यकिरणांनी झाडांचा ऊर्ध्व भाग  सोनाळला होता, डोळ्यावर काळा गॉगल असल्याने सूर्यप्रकाशाचा भगभगीत पणा जरासा कमी झाला होता, एक वेगळीच छटा झाडांना आली होती अगदी मोहक, मी स्वतःशीच विचार करत होते आता उद्या येताना जवळ camera ठेवू आणि ह्या मनमोहक देखाव्याला छायाबद्ध करू. अर्थात हे सगळ केल तर पुढे काय करणार फार तर फार घरी येऊन दोन चार वेळा पुन्हा ती छायाचित्र बघणार अजून चार लोकांना दाखवणार झालं.. अगदी फारच एखाद खास असेल तर PC  च्या desktop वर येणारं असाही एक विचार मनात झरकन येऊन गेला एव्हाना मी आणखीन थोडी पुढे आले होते आता वाटेत दिसलेलं प्रत्येक झाडच मला छान दिसू लागल, छायाचित्रास योग्य वाटू लागल, मग त्यात केशरी फुलांचा गुलमोहोर, गुलाबी शिरीष आणि साधा पिंपळही होता. एक वेगळीच जाणीव झाली काही गोष्टी आपल्या आपल्यालाच अनुभवायच्या असतात.. त्यातला आनंद त्या छायाबद्ध किंवा शब्दबद्ध करून कधीच मिळवता येत नाही. मग आता तुम्ही म्हणाल मग हे तरी कशाला लिहील तर ते वेगळ्याच कारणांनी लिहीलय ... ते आता सांगते... आपण मराठीत काळ्या चष्मातून  बघणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ फारच नकारात्मक लावतो पण प्रत्यक्षात मात्र मी आज काळा चष्मा लावल्याने मला देखावा अप्रतीम दिसत होता, सूर्याचा भगभगीतपणा कमी झाल्याने वेगळीच छटा आली होती जी फारच मनमोहक होती. खुप आनंददायी सकारात्मक वाटत होत...   
त्याला लागुनच असाही विचार आला म्हणजे ह्या दृष्टिकोनातला फरक मुळातल्या दृष्टीत किंवा अजून विस्तृतपणे म्हणायचं तर विचारात आहे काय? त्याचा प्रत्यक्षात किवा अप्रत्यक्षात लावलेल्या चष्म्याशी संबंध नाही. प्रत्यक्षात अशासाठी की जे मला चांगल दिसलं ते दुसऱ्याला दिसेलच असं नाही आणि अप्रत्यक्षात अश्या साठी कारण काळा चष्मा लावणे ह्या वाक्प्रचारात प्रत्यक्षात डोळ्यांवर चष्मा लावणे हा अर्थ अपेक्षित नसून मुळातल्या दृष्टिकोनातला फरक असाच आहे.... 

तेजश्री

पुणे-ठाणे



दुतर्फा हिरवीगार झाडं बहरलेली होती, पांढरे पट्टे मारलेल्या काळ्या लांबसडक वळणावळणाच्या पुणे ठाणे महामार्गावरून मी पुढे सरकत होते,  झाडं, निळे शार आकाश त्यावर बेधुंद नाचणारे पांढरे, राखाडी ढग मागे मागे पळत होते. झाडांचा हिरवाच रंग पण त्यात किती छटा, कुणाचा गडद हिरवा, कोणाचा पोपटी, कुणाचा गर्द शेवाळी, तर कुणाचा पिवळसर. कसाही असला तरी मनाला सुखावणारा, आशेच बीज पेरेल असा, प्रत्येक झाडाची वेगळ्या रंगाची फुल, कुठे पिवळी धमक, कुठे सोनेरी, मधेच शेंदरी गुलमोहोर, अधून मधुन जांभळा रंगही हजेरी लावत होता, झाडांच्या शेंड्यावर पडलेल कोवळ उन झाडाला सोनेरी मुगुट घातल्यासारख शोभत होतं, जस जस ठाण जवळ आल तसा खास असा खारट वास आला आणि खाड्या दिसू लागल्या, मिठागर, मिठाचे पांढरे शुभ्र भले मोट्ठे ढीग  बघत गाडी पुढे जात होती. बगळे, कोर्मोरंटस, कुट पाण्यात मनसोक्त पोहताना दिसत होते. बुलबुल, सनबर्ड, कोकीळ ठीकठिकाणच्या झाडांवर विसावले होते, काळ्या तोंडाची वानर रस्त्याच्या बाजूला बसून वेडावत होती,  थोड्या थोड्या अंतरावरचे लांबलचक भोगदे, रुळावरून भरधाव धावणाऱ्या रेल्वे बघत बघत मी पुढे पाद्क्रमणा केली. एकीकडे निसर्गाची गीते ऐकताना निसर्गाने असा अनोखा प्रतिसाद दिला आणि निसर्गाच वास्तविक सरावाच रूप नवनिर्मिती सारख भासल.   

तेजश्री    

चाफा


हे चाफ्याचे झाडं मी खूप दिवसापासून धोपट मार्गावर बघते आहे. तुम्ही जवळून निरीक्षण केलत तर तुम्हालाही जाणवेल की ह्याचा अर्धाच  भाग पाना-फुलांनी बहरला आहे तर अर्धा पर्णहीन आहे. ह्या झाडाकडे बघताना मला आपल्या समाजवर्गरचनेची राहून राहून आठवण होते. आपल्या समाजातही असेच असते नाही, काही लोक श्रीमंत असतात, बहरलेले, सुखसोयींनी पूर्ण, ह्या झाडाच्या डाव्या अर्धांगासारखे, तर गरीब त्याच्या उर्वरीत अर्धांगाप्रमाणे सुकलेले, ज्यांना सुख सोयी तर सोडाच पण दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांती असते. किती हा विरोधाभास! आणि त्यात आपली अर्थव्यवस्था अशी आहे  की श्रीमंत लोक अजून श्रीमंत होत आहेत गरीब अजून गरीब. समाजातली ही दोन टोक जर योग्य प्रकारे जवळ आली आणि एकमेकांना सहाय्य करू लागली तर कदाचित आजच समाजाच हे चित्र उद्या काहीस वेगळ असेल. कदाचित तेव्हा ह्या समाजरूपी झाडावर समसमान विभागलेली पान आणि फुल असतील.  फुल हे जर आपण सुख समृधीच प्रतिक मानल तर ही सुख समृद्धी सगळ्यांना मिळेल. आणि त्या वेळच ते समाजचित्र जास्त सुखावह असेल.




तेजश्री 
 

आज गोकुळात रंग खेळतो हरी...





वसंत सुरु झाला, पळस, पांगारा फुलले, आंब्याने मोहोर धरला, कोकीळा निनादू लागल्या. सर्वत्र उस्ताह आनंदाच वातावरण होत आणि त्यात भर म्हणून आज होळी होती. सार गोकुळ आनंदाने भरल होत. दरवर्षी कृष्णच आपल्याला भिजवतो, रंग लावतो, यंदा आपणच त्याला रंग लावूयात असा निश्चय राधेने केला आपल्या साख्यांसमावेत तिने लपण्याची जागा निश्चित केली. हौदात रंग कालवून तयार केला आणि हातात रंग घेऊन ती गोकुळाबाहेरच्या एका मोठ्या पाषाणामागे दडून बसली. आता थोड्यावेळात कृष्ण येईल आणि मग आपण त्याला पाठीमागून जाऊन रंग लावूयात, सार नियोजन उत्कृष्ठ होत. पाषाणामागून येणारी कृष्णाची वहिवाट स्पष्ट दिसत होती. जरी तिला सगळ दिसत असाल तरी ती मात्र  कुणाच्याही दृष्टीक्षेपात येणारं नाही ह्याची तिने खबरदारी घेतली होती. नित्य नियमाने कृष्ण गायी गुरांना घेऊन येईल मंजुळ पावा वाजवेल ह्या कल्पनेत ती बराच वेळ बसून राहिली. आता एव्हाना सुर्य मध्यान्हाला आला होता. पोटात कावळे ओरडू लागले, अजून कसा कृष्ण आला नाही एक अनामिक हुरहूर तिच्या मनात दाटली. आता कृष्ण आपल्याला विसरला तर नाही ना? आज होळी आहे हेही तो विसरला असेल का? उगाच आपण दडून बसलो, सगळ्या गोकुळात आता होळीचे रंग खेळत असतील, कृष्णाने आपल्या सख्यांना भिजवले असेल, म्हणजे दरवर्षी त्याच्या हातून सर्वप्रथम भिजून घेण्याचा आपला मान यंदा गेला? असे विचार मनात आले आणि तीच मन हळवं झालं, कितीही झालं तरी तीच कृष्णावर निस्सीम प्रेम होत. तिच्या अश्या वागण्याने कृष्ण तिला विसरून जाईल असा विचारदेखील आत्तापर्यंत तिच्या मनाला शिवला नव्हता. करायला गेलो एक आणि झालं भलतच ती झरकन पाषाणा मागून उठली. हातातला रंग एव्हाना घर्मबिंदुंनी ओला झाला होता, त्याचे ओघळ कोपरावरून खाली ओघळले होते. तिने तो रंग तसाच मातीत टाकून दिला आणि हात झटकून ती मागे वळणार इतक्यात मागून दोन रंगलेले हात तिच्या डोळ्यासमोर आले, आणि काही कळण्याच्या अगोदरच तिला संपूर्ण रंगवून टाकले. हा कृष्णच!  ज्याच्यासाठी आपण लपून बसलो तो साक्षात इथे आलाय म्हणजे तो आपल्या सख्यांबरोबर नाही, तो आपल्याला विसरलेला नाही, तिच्या डोळ्यात चमक आली, ओठांवर हसू आल, कृष्णाकडून रंग लावून घेण्यातला आनंद तिच्या रोमारोमातून उमटू लागला. ती उमलू लागली. पण दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही फसलो आपण कृष्णाला ह्या वर्षी देखील प्रथम रंगवू नाहीच शकलो ह्याची थोडीशी खंत तिच्या उरी दाटली. मातीत मिसळलेला रंग तिने उचलून झपदिशी कृष्णावर फेकला आणि गोकुळाच्या दिशेने ती धावली. एकमेकांवर मनसोक्त रंग उधळत, छेडछाड करत त्यांनी होळी साजरी केली. कृष्ण राधेची रासक्रीडा अवघ गोकुळ कौतूकान बघत होत. आज राधेला कृष्णाने रंग लावला होता. राधा कृष्णमय झाली होती. राधेच स्वतःच असं अस्तित्वच उरल नव्हत, उरला होता तो फक्त कृष्ण कृष्ण आणि कृष्णच!!!

तेजश्री            

गणपती बाप्पा मोरया


गणपती बाप्पा मोरया .... मंगलमूर्ती मोरया... ह्या गजरात अनंत चतुर्दशीची मिरवणूक सुरु आहे सगळी कडे उस्ताहाच चैतन्याच वातावरण आहे... ढोल ताशे अन असंख्य गणेशभक्त ह्यांच्या बरोबर गणपतीला निरोप दिला जातोय... माझ मन खूप समाधानी आहे त्याला कारणही तसच आहे यंदाच्या वर्षीचा हा गणपती उस्तव माझ्यासाठी फारच विशेष ठरला. गणरायाची छोटी मोठी सेवा झाली खूप छान वाटल... सर्वप्रथम गणरायाची मूर्ती साकारायला मिळाली. शाडूच्या मातीची मूर्ती साकारताना गणपती बद्दलच्या नवीन नवीन खुबी कळत गेल्या अन मी बाप्पाच्या नव्यान प्रेमात पडले. बरच काही शिकायला मिळाल हे काही थोड होत म्हणून लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणपतीपुढे रांगोळीची पायघडी घालण्याचा अनुभव मिळाला.. पायघडी व्यतिरिक्त पण गणरायाच्या जल्लोषात त्याच स्वागत करताना एक दांडगा उस्ताह संचारला होता ... दरवर्षी माझ्या घरी असलेल्या उस्तवात तर मी सहभागी होतेच पण हा अनुभव काही औरच होता.... आशा करते.. गणपती बाप्पा नेहमी प्रमाणे माझ्या पाठीशी असेलच आणि अशीच सेवा नेहमी करून घेईल.... गणपतीला निरोप देताना खूप वाईट वाटतंय... पण मी आता एवढच म्हणेन गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!!!!!!!!!!

तेजश्री 

काकड आरती




कोजागिरी पौर्णिमा अत्यंत साध्या, घरगुती पद्धतीने साजरी केल्यावर आजचा काकड आरतीचा अनुभव लाजवाब होता. मुरलीधराच्या मंदिरात काकड आरतीला उपस्थित राहण्याचा प्रस्ताव कुणी मांडला आणि त्याक्षणीच मी होकार दिला. पाहटे साडे चारला उढून शुचिर्भूत होऊन पाच वाजता आम्ही घर सोडलं. जस जसे मुरलीधराचे मंदिर जवळ येऊ लागले तसे चौघड्याचे आवाज कानी येऊ लागले. देवळाबाहेर रेखाटलेली रांगोळी बघून मन प्रसंन झाले अन आम्ही देवळात प्रवेश केला. विविध वयोगटातले स्त्री पुरुष येत होते काही आधीच उपस्थित होते. काही स्त्रिया दिवा लाऊन नैवेद्य दाखवत होत्या, मग काकुनेही बरोबर आणलेला लोणी साखरेचा नैवेद्य कृष्णासमोर ठेवला, नटखट माखनचोर कृष्णाला ह्या पेक्षा सरस कोणता नैवेद्य असू शकतो असा विचार करत मी समाधानाने वंदन केले. तेवढ्यात पुजारी आले त्यानी गाभार्याच दार उघडल आणि कृष्ण राधेची द्विभुज , मानवरूपी मूर्ती आणखीन स्पष्ट दिसू लागली. गडद गुलाबी रंगाचा वेश धारण केलेला 'मुरली' धर खूपच मोहक दिसत होता मला त्याच्या मोहन ह्या नावाची अचूक प्रचीती आली. कृष्णाच्या वाम अंगाला राधा आणि चरणापासच्या दोन गाईनाही सारख्याच रंगाचा वेश होता. काकड आरती म्हणजेच काकडा हि देवाला जाग करण्यासाठी म्हणलेली प्रार्थना. अश्विन पौर्णिमेला सर्वप्रथम विठठलाच्या देवळात हा काकडा होतो त्या नंतरच्या दिवशी म्हणजे कालपासून इतर देवळातही ह्याला सुरवात होते. हि काकडारती पुढे महिनाभर रोज केली जाते. अतिषय पारंपारिक पद्धतीने शंखनाद करून ह्याला सुरवात झाली. सर्वप्रथम अत्योच्च स्वरात भूपाळू म्हणून देवाला उठवण्याचा कार्यक्रम झाला गाभाऱ्यात एक गुरुजी मंद लईत निरंजन ओवाळत होते. बाहेरच्या प्रशस्त मंडपात पुढे पुरुष आणि मागे स्त्रिया उभ्या राहून देवाला उठवण्यासाठी आर्जवत होत्या. भूपाळी पाठोपाठच काकड आरत्या सुरु झाल्या एका पाठोपाठ एक सात ते आठ आरत्या म्हणल्या. आपल्या भारदस्त आवाजात एक वयस्कर गुरुजींनी जेव्हा आरत्यांना सुरवात केली तेव्हा माझ्या मनात सहज एक विचार आला एवढ्या उच्च स्वरातल्या अर्जवता ऐकून कोणता देव उठणार नाही? टाळ, झांजा इ. वेगवेगळ्या वाद्यांनी टाळ धरला आणि मी तल्लीन झाले. एका लईत म्हटलेल्या त्या आरत्या प्रसन्न करणाऱ्या होत्या. हरेक नविन अर्तीचीची सुरुवात शंखनादाने झाली. एव्हाना गाभार्यातल्या गुरुजींनी निरांजन ठेऊन उदबत्ती घेतली होती. मंद लइत ओवाळली जाणारी उदबत्ती आणि तिचा दरवळणारा सुगंध मनमोहक होता. एक एक लोक येत होती आजूबाजूला राहणरी लोक विशेष उपस्थित होती. मुरलीधराच्या मंदिरातली ह्या वर्षीची हि पहिलीच काकड आरती असल्याने उस्ताह ओसंडून वाहत होता. विजेच्या दिव्या उजलेल्या राधा कृष्णाच्या मूर्तीला डोळ्यात साठवत आरतीची सांगता झाली. प्रदक्षिणा घालून तुळशीला नमस्कार करून आम्ही पुन्हा मंडपात आलो. कृष्णमूर्तीच्या बरोबर समोर अजून एक मंदिर आहे गरुडाच, विष्णूचे वाहन गरुद्रजालाही वंदन करून आम्ही निघालो डोळ्यात एक नविन अनुभव आणि मनात समाधान घेऊन. अश्या काकड आरतीचा आनंददायी अनुभव तुम्हीही जरूर घ्या

तेजश्री 

देवदिवाळी


                     वैकुंठ स्मशानभूमी हे नाव जरी घेतलं तरी लोक भुवया वर करतात, आणि राष्ट्रीय कला अकादमीने मात्र तिथेच जाऊन दिपोस्तव साजरा  करायचं आणि तेथे अखंड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करायचं ठरवलं. दरवर्षी हे कार्यकर्ते देवदिवाळीला न चुकता वैकुंठात दिपोस्तव साजरा करतात आणि छोटीशी का होईना पण तेथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना भेट देतात. ह्या वर्षी ह्याला १२ वर्ष झाली. यंदा मला हा सोहळा जवळून बघण्याची संधी मिळाली आणि कळून चुकल किती थोर काम करता आहेत हे सगळे कार्यकर्ते, आणि त्याच बरोबर मीही ह्यांच्यात सहभागी झाले ह्याचा अभिमान वाटला. 
                     काल सायंकाळी म्हणजे देवदिवाळीला ( मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा) आम्ही सगळे राष्ट्रीय कला अकादमीचे कार्यकर्ते वैकुंठात जमलो. वैकुंठस्मशानभूमीतील विद्युतदाहिनीजवळील मंडपात आम्ही पोहचेपर्यंत सुनील सरांनी रांगोळी रेखाटायला सुरवातही केली होती, काकस्पर्षाची कल्पना घेऊन अतिषय सुंदर रांगोळी रेखाटण्याच काम सुरु झाल होत, आम्हीही आपापल्यापरीने मदत करायला लागलो. पिंडाला तीन कावळे शिवतानाचा प्रसंग इतका जिवंत रेखाटलेला पाहून खूप छान वाटल. सकाळपासून असलेली नैराश्याची झळ दूर गेली, आधी वाटल होत कस असे तिथल वातावरण, आणि कश्या असतील तिथल्या लोकांच्या मनस्थित्या? पण तिथल उस्ताहाच वातावरण बघून चैतन्य आल, आणि भराभर कामाला लागलो. काही जणांनी बाहेरच्या प्रवेशद्वाराजवळच्या शंकराच्या मंदिरासमोर रांगोळी रेखाटावी अस ठरलं, आणि आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला. कुंकू, भंडारा, हिरवा असे मोजकेच रंग घेऊन अर्धवर्तुळात सुंदर रांगोळी रेखाटली. तिकडची रांगोळी पूर्ण होईपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती, मग विद्युतदाहिनीच्या परिसरातील सगळ्या झाडांभोवतालच्या पारांवर मांडलेल्या पणत्या लावायला आम्ही कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. अवघ्या काही क्षणात तिथला परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला. पणत्या लावून आम्ही सभामंडपात आलो, एव्हाना सुनील सरांची रांगोळी पूर्ण झाली होती, त्या चित्राला अनुसरून लिहिलेली कविता हृदयस्पर्शी वाटली. 
  
' वैकुंठमय मम देह जाहला 
 दशदिन आत्मा फिरत राहिला 
 काक स्पर्श हा जेव्हा घडला 
 सर्वांचाच मग जीव भांड्यात पडला 
 तिलांजलीही मग जाहली 
 ह्या आत्म्याला मुक्ती मिळाली ' 


                     रांगोळी आणि काव्य ह्यांचा सुरेख संगम डोळ्यात साठवत आम्ही आसनस्थ झालो आणि पुढील मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. एक एक करून कर्मचार्यांना बोलावून यथोचित सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगाचे औचित्त साधून आमंत्रित मान्यवर मंडळीनी कृतज्ञता व्यक्त केली.  उदय जोशी ह्यांनी सूत्रसंचालन केले, दररोजच्या जीवनात येणारे विविध प्रसंग सांगितले आणि अंगावर काटा आला त्याचबरोबर तेथे काम करणाऱ्या लोकांच कौतुक वाटल. 
  एकदा एका नुकत्याच बाळंतीण झालेल्या स्त्रीचा देह तेथे आण्यात आला होता, बरोबरच तिच्या नवजात अर्भकाचाही देह आणण्यात आला होता मात्र त्या बालकाच्या मृत्यूच प्रमाणपत्र नातलगांजवळ नव्हत तरीही तेथील कर्मचार्यांनी तो प्रसंग योग्य प्रकारे हाताळला हे ऐकून बर वाटल, अश्या प्रसंगात दुःखी नातलग हमरीतुमरीवर येतात आणि तरीही तेथील कर्मचारी अतिषय नम्रपणे, शांतपणे प्रसंग सांभाळून घेतात हे ऐकून त्या लोकांच कौतुक वाटल. कधी कोणी नेते कुठल्या अंत्ययात्रेबरोबर येतात आणि लवकर अंत्यविधीला घेण्यासाठी विनवणी करतात मात्र येथील कर्मचारी नियमांचं काटेकोरपणे पालन करतात आणि सामान्यांना योग्य तो न्याय देतात हे ऐकून वाटल, इथे तरी राजकारण चालत नाही हे समधानकारक आहे. कधी असाही प्रसंग येतो की देहाबरोबर केवळ एकच नातलग असतो अश्या वेळी हे कर्मचारी आपुलकीनी सगळ करतात, त्या नातलगाचा शोक आवरतात , त्याला धीर देतात, हे ऐकताना अंगावर काटा आला, कश्या आणि कोणत्या प्रसंगातून इथली काम करणारी मंडळी जात असतील हे समजल तेव्हा गदबदुन आल. रात्री अपरात्री आणलेल्या मृतदेहावर अंतिमसंस्कार करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केवळ तेथील एका कुलकर्णी नावाच्या गृहस्थांनी ते विधी शिकून घेतलेत हे ऐकल तेव्हा वाटल किती हे समर्पण आणि किती ही कामावरची श्रद्धा. असे एक ना अनेक प्रसंग ऐकताना पुन्हा पुन्हा एकच भावना येत होती, हे कर्मचारी आहेत म्हणून आज मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावली जात आहे. हे ह्या लोकांच समाजावर असलेल ऋणच आहे.  हे समाजऋण कधीच फिटणार नाही परंतु त्यासाठी राष्ट्रीय कला अकादमीचे  कार्यकर्ते योग्य पाऊल उचलत आहेत हे पाहून खरच धन्य वाटल. अश्या ह्या विचित्र परिस्थितीत कणखरपणे काम करणाऱ्या लोकांना देवदिवाळीच्या निम्मिताने दिलेला असा हा सन्मानाचा सोहळा डोळ्यात साठवत आम्ही समाधानाने परतलो. 


तेजश्री 


७/१२/२०१०