Sunday, November 13, 2011

मुलाखत श्रीमती ज्योती मुंगसे


                'हृदयज्योत' संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा श्रीमती ज्योती मुंगसे ह्यांना सुद्धा जन्मजात हृदयदोष आहे. हृदयदोष असणाऱ्या  मुलांना व पालकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा स्वानुभव आल्यामुळे ह्या संस्थेची स्थापना ३ जून २००४ मध्ये करण्यात आली. मुख्यतः हृदयदोष असणाऱ्या मुलांच्या पालकांना समुपदेशनामार्फत मानसिक आधार दिला जातो तसेच हृदय शस्त्रक्रियेसाठीच्या निधी संकलनाबाबत आवश्यक ती माहिती पुरवली जाते व शस्त्रक्रिया होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिले जाते.  ज्योती ताईंशी बोलताना हळूहळू उलगडा झाला की निसर्गाने विविध  हृदयदोष, फुफुसदोष एकाच वेळी देऊन ताईंची जणू सत्वपरीक्षाच घेतली त्यातून त्यांनी जिद्दीने दिलेला जीवनलढा खूपच स्फूर्तीदायी आहे. 
              'हृदयज्योत' संस्थेची स्थापना करण्यामागची कारणं सांगताना ज्योतीताई म्हणाल्या, मैत्रिणीच्या साधर्म्य असणाऱ्या अशाच हृदयदोषात जीव तोडून केलेले प्रयत्न शेवटी अपुरे पडले आणि शस्त्रक्रीयेआधीच ती दगावली तो सर्वात पहिला घाव होता, त्यातून एक अपराधीपणाची भावना आली. पुढे स्वतःच्या आयुष्यातही जगण्यासाठी बराच झगडा करावा लागत होता. जीवनातील मजा अनुभवताना त्रासही तितकाच होत होता, थोडीदेखील दगदग सहन व्हायची नाही, कॉलेजमध्ये असताना दोन तास दांडीया खेळल्याच मोल त्यांना सहा महिने पलंगावर काढून मोजाव लागल शिवाय कॉलेज सुटल ते निराळच.  त्यानंतर पार्लर, पाळणाघर चालवणे ह्या सारखे बारीक सारीक उद्योगही ताईंनी केले. मनातली जिद्द कायम होती त्यामुळे त्यांनी अर्धवट राहिलेलं 'बीए'चं शिक्षण पूर्ण केल पुढे एमएला देखील प्रवेश घेतला मात्र तेव्हा शरीरानी म्हणावी तितकी साथ दिली नाही शिक्षण पुन्हा सुटल अडीच वर्ष पलंगावर काढावी लागली, सवंगडी आपापल्या व्यापात, अश्या आजारात कुणी जवाबदारी घेणंही अवघडच, कुठे जाण येण नाही, दिवसरात्र पलंगावरच काढायची, असं झगडत आयुष्य काढावं लागतंय ह्यामागच देवाचं प्रयोजनही समजत नव्हत. पण ह्या काळात एक विरंगुळा होता तो पुस्तकांचा! वाचनाची आवड असल्याने ज्योती ताई ह्या काळात खुप वाचत राहायच्या, ह्याच दरम्यान वाचनात आलेल 'चाकाची खुर्ची' हे नसीमा तस्लीम हुरजूक ह्यांच पुस्तक खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान बनल आणि आपल्यासारख्याच हृदयदोष असणाऱ्या मुलांसाठी आपण काहीतरी कराव ही कल्पना प्रबळ होत गेली. स्वतः पलंगावर असताना हे कस काय करणार ह्या विचारात सुरवात म्हणून  स्वतःवर एक लेख त्यानी 'सकाळ' साठी लिहिला त्यात अश्या रुग्णांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती त्त्यातून असंख्य फोन, पत्र आली. सुरवातीला लोकांनी त्यांच्यासमोर सांसारिक प्रश्नांपासून अगदी कर्करोग, एडस सारख्या समस्या मांडल्या पण मग पुढे त्यातून हृदयदोष ह्यावरच लक्ष नियंत्रित करून ताईंनी 'हृदयज्योत' नावाची संस्था स्थापन केली. 
                'हृदयज्योत' संस्थेच काम थोडक्यात सांगताना त्यांनी नमूद केल, सुरवातीला हृदयदोषाच्या रुग्णांना मानसिक आधार देतात व त्यांचे समुपदेशन करतात.  त्याबरोबर कोणत्या संस्था ह्या रोग्यांसाठी मदत करतात त्यांच्या कडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कसा करायचा ह्याच मार्गदर्शन करतात. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सोई लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एकंदरच ह्या व्याधीविषयी जनजागृती करण्यासाठी खेडोपाडी जाऊन ताईंनी व्याख्याने दिली, व तीन वर्ष समुपदेशन केंद्र चालवले 
                हृदयदोष असणाऱ्या चिमुरड्यांच्या पालकांना त्यांनी योग्य वयात निदान झाल्यावर औषधोपचार, गरज भासल्यास शस्त्रक्रिया, अविलंब करण्याचा संदेश दिला. 
                हृदयदोषावर जनजागृतीकरणारा 'हृदयाची गोष्ट' नावाचा माहितीपट नुकताच सप्टेम्बर ०११ मध्ये त्यांनी प्रदर्शित केला असून आगामी दिवसात हा माहितीपट राष्ट्रीयपुरस्कारासाठी पाठवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. 'हृदयज्योत' नावाची ह्या हृदयदोषावरील पुस्तिका त्यांनी २००८ मध्ये प्रकाशित केली आहे. हृदयदोषावरील सविस्तर माहिती, निदानपद्धती, उपचारपद्धती, सरकारी मदतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहितीही ह्यात पुरवली आहे. 
              सरकारने जरी हृदय शस्त्रक्रियेसाठी  विवीध योजना राबवल्या असल्या तरी सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रीयेनंतर लागणाऱ्या उपकरणांची सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना खाजगी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे पर्यायाने सरकारकडून मिळणाऱ्या सवलतीचा फायदा त्यांना होतच नाही ह्या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली 
                शारीरिक अडचणीमुळे गाणं, नाच किंवा रांगोळीची कला अवगत करण्याच राहून गेलं असल तरी अगदी पांढऱ्या भुकटीनी नाही तरी अनोख्या, अद्वितीय जिद्दीनी मात्र ज्योतीताईंनी आयुष्याची रांगोळी फारच उत्तम रेखाटली आहे. राष्ट्रीय कला अकादमीचे कार्यकर्ते छान छान रांगोळ्या काढतात असं कौतुक करताना त्यांनी पायघडी अभियानात सहभागी झाल्याचे सांगितले. 
                 बहुश्रुत आणि स्वाभिमानी असल्यामुळे स्त्रियांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या स्त्रियांनी त्यांची मानसिकता बदलायला हवी, शिक्षण नोकरी आणि त्यात असणाऱ्या आरक्षणाच्या हमीमुळे त्यांच्यात येणाऱ्या अहंपणावर व अधुनिकतेकडे वाहवत जाण्यावर कुठेतरी आळा बसायला हवा असं परखड मत त्यांनी व्यक्त केल. स्त्रियांना आरक्षित ठेवलेली जागा जर पुरुषांना मिळाली तर त्यांची कुटुंबे चालू शकतील आणि पुरुषप्रधान समाजात घरातली बाई कमावती आणि पुरुष घरी बसलेला हे दृश्य दिसणार नाही त्यातून पर्यायाने निर्माण होणारे वितुष्ट, वादविवाद, घटस्फोट कमी होतील असही त्या म्हणाल्या. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आधी स्वतः पासून सुरवात करावी असा मोलाचा संदेश त्यानी दिला.
             आजचा आधुनिक समाज बघता स्त्रियांनी  स्वावलंबी व सुशिक्षित असण्याची गरज असून स्त्रियांवर होणारे अत्याचार, शारीरिक, मानसिक छळ रोखण्यासाठी स्त्रियांनीच संयमाने व खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केल. 
 
 
मुलाखत श्रीमती ज्योती मुंगसे 
मुलाखतकार तेजश्री पावसकर
रेवती ढमढेरे
शब्दांकन: तेजश्री पावसकर 
०७.११.२०११