Sunday, June 5, 2011

नाण्याच्या दोन बाजू

नाण्याला दोन बाजू असतात, एक छापा एक काटा. एखादी गोष्ट चूक की बरोबर हे ठरवण्यासाठी किंवा आपल मत मांडण्यासाठी आपण ह्या नाण्याच उदाहरण हमखास देतो. असा एक सर्वमान्य समज आहे की ह्यातली एक बाजू बरोबर किंवा योग्य असते आणि दुसरी चूक अथवा अयोग्य. पण गेल्या काही दिवसात वेगळ्या वेगळ्या गोष्टी अश्या स्वरुपात समोर आल्या की माझ एक मत तयार झालंय, ते असं की दरवेळेसच हा नियम लागू होत नाही. नाण्याच्या दोन बाजू तर असतात पण त्यातली एक योग्य असते आणि दुसरी पण योग्यच असते. कोण ठरवत त्याची योग्यता? तर ती आपण माणसच, सदसदविवेक बुद्धीनी आपण हा निर्णय घेऊ शकतो आणि त्यावरून निकषही लावू शकतो. हा असा विचार जेव्हापासून माझ्या मनात आला तेव्हा पासून एक बदल तर नक्की झाला अन अशी जाणीव झाली की आपल्याला अपेक्षित असलेल समोरची व्यक्ती वागत नसेल किंवा अपेक्षित प्रतिक्रिया देत नसेल तर होणारी चिडचिड थोडी कमी झाली आणि ती व्यक्ती तसं वागण्यामागे योग्य असं काहीतरी कारण तर नक्की असणार ह्याची खात्री वाटू लागली. असं ढोबळ बोलण्यापेक्षा काही अनुभवच सांगते,
 आज पर्यावरण दिन, पर्यावरण जागृकतेवरच्या एका चर्चेत मी एक श्रोता म्हणून सहभागी झाले होते, आणि माझ दोनही बाजू योग्य असं शकतात हे मत अधिकच प्रबळ झालं. आपण दरवेळेस हेच ऐकतो की झाडं लावा झाडं जगवा आणि झाडं तोडू नका आणि पर्यावरण रक्षक तर झाडं न तोडण्यासाठी जीवाचा इतका आटापिटा करत असतात, तर ह्या चर्चेत एकूण चार लोक सहभागी होते त्या पैकी तिघांचं बोलून झालं आणि त्यांच्या मते झाडं लावली पाहिजेत ती तोडता कामा नयेत आणि त्यांच्याच बरोबर जे चौथे गृहस्थ होते त्याचं मात्र जरा चमत्कारीकच मत होत. चमत्कारिक अश्यासाठी म्हणल कारण असा विचार मी तरी ह्या पूर्वी कधीही केला नव्हता आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा विचार वाटला. ते एक आर्कीटेक्चर होते आणि त्यांच्या मते घर बांधताना आपण लाकडाचा वापर अधिक करायला हवा.... आश्चर्य  वाटल ना... पण ह्या वर त्यानी जो खुलासा दिला  तेव्हा त्याचं म्हणण अंशतः का होईना पटल, नाहीतर इतर वेळेस असं बोलणाऱ्या माणसाला मी वेड्यात काढल असत आणि कदाचित पुढच काहीही ऐकून पण नसत घेतलं... पण त्या गृहस्थांच्या मते आपण सध्या घरबांधणी करताना स्टीलचा वापर करतो, स्टील साठी लागणार लोखंड आणि इतर गोष्टी आपण खाणीतून काढतो, बर ह्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा वापरत नाही, म्हणजे रिसायकल करत नाही, तेव्हा पुढे जाऊन खाणीतील खनिजे जेव्हा संपुष्टात येतील तेव्हा आपण काय करणार? त्यांची निर्मिती आपण माणस तर करूच शकत नाही, ह्या उलट लाकूड ही अशी गोष्ट आहे जी आपण प्रयत्नांनी निर्मित करू शकतो, ते म्हणजे झाडं लावून, तेव्हा स्टील किवा तत्सम खनिजांचा वापर टाळून आपण लाकडाच्या वापरावर अधिक भर द्यायला हवा, म्हटल तर ही बाजू अतिषय योग्य आहे, खरोखर प्रयत्न करून आपण झाडं लावून लाकुडनिर्मिती करून शकतो पण दुर्दैवानी आज झाडं तोडण्याची संख्या आणि लावण्याची संख्या आणि झाडं वाढून वृक्ष होऊन त्याची लाकड वापरात येऊ शकतील ह्याला लागणारा कालावधी ह्याचा ताळमेळ काही बसत नाही आणि ही गोष्ट अशक्यप्राय भासू लागते..... 
आणखीन एक उदाहरण म्हणजे एअर कन्डीशनरचा वाढता वापर, आता ह्याचा वापर करु नये कारण त्याने ग्लोबल वार्मिंग वगेरे होत हे तर आपल्याला माहीतच आहे त्यावर पुरेशी चर्चा आपल्या कानावर पडलेलीच असेल आपणही त्यावर पुरेसा चोथा होईपर्यत चर्चा केली असेल पण जर मी म्हणाले त्याचा वापर गरजेचा आहे तर.... आश्चर्य वाटेल कदाचित पण त्याला जोडून मी जर काही खुलासा केला तर कदाचित आपल्याला हे पटू शकेल... मी सध्या जिथे काम करते त्या प्रयोगशाळेत काही किमती अशी यंत्रे आहेत आणि ती सुरळीत चालवण्यासाठी तापमान हा एक प्रमुख घटक आहे आणि त्यासाठी  एअर कन्डीशनरचा वापर अत्यावश्यकच आहे, म्हणजे मी अत्यावश्यकच मध्ये च वर एवढा भर देते आहे त्यामागे असं कारण आहे, एकदा असच मी खुप थंडी वाजते म्हणून २६ अंश तापमान बदलून २७ केल आणि मग निश्चिंतपणे एक यंत्र वापरायला सुरवात केली. यंत्र सुरु केल्यावर त्याच कॅलीब्रेशन करण हा एक महत्वाचा भाग असतो आणि तेव्हा असं लक्षात आल ते तापमान १ अंशांनी वाढवल्यामुळे ते यंत्र कॅलीब्रेशन फेल्यूअर झाल्याच दाखवत होत. मला त्या खोलीच तापमान पुन्हा पूर्ववत होई पर्यंत थांबाव लागल... आणि एक वेगळा धडा मिळाला
काही दिवसांपूर्वी माझ्या भाचीला तेलमालिश करून अंघोळ घालायला एक मावशी येत असत, त्यांचा पहिलाच दिवस होता तेव्हा त्यानी तिला अंघोळ घालताना तिचे तोंड साफ केल नाही तर साहजिक त्यानंतर असा विषय झाला तेव्हा मी वहिनीला म्हटल की त्यांना सांगायला हव की तीच तोंड आतून साफ करत जा, आपल्याला हव तसं काम आपण करून घ्यावा लागत ... त्याचं त्याचं ते स्वतःच्या मनानी नाही करु शकत... वगेरे वगेरे आणि म थोडावेळ झाला, बाबा आले आणि त्यांना सहज मी हे सगळ सांगत होते की त्या मावशीनी तोंड नाही साफ केल पण बाकी व्यवस्थित घातली अंघोळ... त्यावर बाबा म्हणाले नाही केल तेच बर झालं... अरे? बरोबर माझ्या विरुद्ध मत? पण का? मी प्रश्न विचारायच्या आताच ते उतरले... कस आहे, त्या मावशी कुठून येतात आणि त्यांचे हात किती साफ असतात काय माहित... आपण हात धुवायला लावू सुद्धा एकवेळ पण   त्यांची नख?... त्यात अडकलेला मळ... त्यानी जर काही जखम झाली तर? त्यापेक्षा नकोच... खर तर होत त्याचं म्हणण
असच एकदा मी रस्त्याच्या कडेला एका ताईंबरोबर उभी होते एक दहा बारा वर्षाची मुलगी जवळ जवळ पळतच आली आणि आमच्यासमोरच्या रिक्षात शिरण्यासाठी तिच्या पाच सहा वर्षाच्या छोट्या बहिणीला गळ घालू लागली... पाठीमागून त्यांची आज्जी येत होती... छोटी बहिण आज्जी यायच्या आत आपण बसलो तर आज्जी मागेच राहील ह्या भावानेनी कावरी बावरी झाली होती तिला काय कराव काही सुचत नव्हत, एकदा पुढे तिच्या ताईकडे आणि एकदा मागे आज्जीकडे बघत ती रिक्षाजवळ आली ... अखेर ताईने खूपच गळ घातली किंवा जवळजवळ ताईगिरी केली म्हणून ती आत चढली... त्या मोठ्या ताईनी रिक्षावाल्यांना पत्ता सांगितला आणि एवढ्यात त्या दोन बालीकांची आज्जी तिथे आली आणि जोरात त्या दोघींना ओरडली.... तुम्हाला घाई करायला कोणी सांगितलेली मी येईपर्यंत सुद्धा तुम्हाला दम निघत नव्हता का? म्हटल तर अगदी बरोबर होत आज्जींच आजकाल कुणाची खात्री राहिली आहे? समजा त्या आज्जी यायच्या आधी रिक्षावाल्यांनी त्यांना नेल असत... तर? कदाचित हीच भीती त्या आज्जीना  वाटली असावी आणि त्याच काळजीपायी त्या तसं बोलून गेल्या... रिक्षा गेली आणि मग मला ताई म्हणाल्या किती चुकीच वागल्या ह्या आज्जी... त्या मुलीनी एवढी छान रिक्षा थांबवली आणि किती व्यवस्थित पत्ता सांगितला तिने  तेव्हा तीच कौतुक करायचं तर असं बोलून त्यांनी त्या मुलीचा आत्मविश्वास कमी केला ... मुलांच्या मानसिकतेवर ताईंचा अभ्यास होता त्यामुळे त्या अधिक खात्रीपूर्वक सांगत होत्या अश्या प्रसंगांमुळे निरागस बालमने दुखावतात आणि पुढच्यावेळेस आपण एखादी गोष्ट करू शकतो हा स्वतःवरचा विश्वासच ते विसरून जातात आणि जी खुप गंभीर बाब होऊ शकते...       
अशी एक ना अनेक उदाहरणे घडतात आणि नाण्याच्या दोन्ही बाजू योग्य भासतात....  

तेजश्री 
०५.०६.२०११ 

No comments:

Post a Comment