Sunday, June 12, 2011

एक दिवस जंगलातला


निळ तळ दूरवर पसरल होत, मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर नुकतीच नाहून निघालेली हिरवी गार पान पक्ष्यांच्या सुरेल गाण्याला सुरेख साद करत होती, मधेच एखाद पिकल पान वारयावर स्वार होत आरामात खाली उतरत होत, तळ्यात उतरलेल्या गुलमोहोराच्या पाकळ्या इवलुश्या नावेप्रमाणे पाण्यात आपल रूप न्याहाळत पांगल्या होत्या. नीळ आभाळ आपल प्रतिबिंब बघण्यासाठी हिरव्या कमलदलांशी  स्पर्धा करत होत, गुलाबी, पिवळी, निळी कमळे आपल्या तळ्यातल्या वास्तव्याची आठवण करून देत होती. हिरवेगार मखमली गालिचे तळ्याच्या दोहोबाजुनी फोफावावले होते, अधून मधून पिवळ्या, तांबड्या तृणफुलांचे ताटवे वर डोके काढून सूर्य किरणांना धिटाईने सामोरे जात होते. फुलांवर भिरभिरणार्या पिवळ्या, लाल, निळ्या फुलपाखरांना क्षणभरही थांबण्याची उसंत नव्ह्ती. एकमेकात गुंफलेल्या फांद्यांच्या औदुंबराखाली मी पोहोचले, तळ्याकाठच्या परिसरात थोडावेळ घालवल्यावर मी पलीकडच्या जंगलात जाण्यासाठी तळ्याच्या डाव्याबाजूच्या अरुंद पुलाजवळ आले. पुलावरून कसरत करत मी पलीकडे पोहोचले, गवत दोहोबाजुनी कंबरेच्या वरपर्यंत वाढल होत, हातातल्या वाळक्या काठीने ते बाजूला करत मी जंगलाची वाट धरली, समोरच्या वडाने आपले जवळजवळ शे दोनशे हात पाय जमिनीत घट्ट रोवले होते, अर्थात एवढ्या महाकाय वृक्षात अनेक जीव सामावले होते, असंख्य और्कीडस आपल्या हक्काच्या घरासारखी पाय पसरून बसली होती. एवढ्यात पाण्यातून सळसळत एक पाणसाप तळ्याच्या काठावर आला, सकाळच कोवळ उन्ह खायला आला असावा बहुतेक कारण त्या नंतर तो तिथेच ठिय्या मांडून बसला, पायापाशी झालेल्या हालचालीने माझ लक्ष बुटाकडे गेलं तर एक बेडूक माझ्या बुडाच्या लेसशी खेळत होता. माझ लक्ष गेल्यावर मात्र साहेबांनी तळ्याच्या दिशेने धूम ठोकली. मी जंगलाकडे निघाले समोरच्या उंच झाडाच्या ढोलीत दोन पोपट बसलेले मला दिसले. पोपटिण बहुदा आज दूरवर फिरायला जाण्याचा हट्ट आपल्या जोडीदाराकडे करत असावी, तीच पोटावर वाकून त्याच्याकडे बघण, मन वळवून विशिष्ठ आवाज करण आणि म पोपट राजी झाल्यावर पंख फडफडवून व्यक्त केलेला आनंद पाठोपाठ त्या दोघांच दूरवर उडत जाण ह्यातून मला तरी असाच बोध झाला, माणसात असतात तेच भाव पक्षातही असतात असं जाणवलं आणि मजा वाटली. टौक टौक असा आवाज कानी पडू लागला, नजर तांबट पक्ष्याला शोधू लागली, आणि त्या आधी बुलबुलांची जोडी नजरेस पडली. एका बुलबुलाच्या चोचीत कसलं तरी फळ होत. ड्रोन्गोरावांनी आपली उलट्या व्ही ची शेपटी हलवत आपली उपस्थिती दिली. पलीकडच्या झाडावर फुलांभोवती फुलचुख्या एकसंध लयीत पण खुप वेगाने पंखांची फडफड करत होत्या, एवढ्याश्या जीवाला दमण्याची चिंता, कल्पनाच नव्हती. एवढ्यात निळ्या रंगाने माझ लक्ष वेधून घेतलं, तोंडात मासा धरून खान्डोपंत बसले होते, दोनदा मासा हवेत उडवून त्यांनी तो मासा गिळंकृत केला आणि पुढला मासा पकडण्यासाठी त्यांनी तळ्याच्या दिशेने रवानगी केली. पंखावरल्या  चमचमणाऱ्या निळ्या रंगाने डोळ्याच पारण फिटलं. काळ्या तोंडाच्या वानरांची टोळी नुकतीच तिथून गेली असावी, कारण अर्धवट खाल्लेल्या फळांचा सडाच मला दिसला, आणि त्यातलं एक अर्धवट वयातल एक पिल्लू मागेच राहील होत, माझी हालचाल होतच त्यानेही उड्या मारत पाच पन्नास झाडं मागे टाकली. थोड आणखीन आत गेल्यावर नाचऱ्या पक्षांचा सामुहिक नाच सुरु होता, आपली शेपटी पंख्यासारखी फुलवून त्यांचा नृत्याविष्कार बघताना मला आफ्रिकन झुंबा नृत्याची आठवण झाली, त्यात नृत्यप्रकारात सुद्धा असंच खाली बघून स्वतःभोवती गिरकी घेण्याच्या काही स्टेप्स असतात. त्याचं नृत्य बघण्यात मी रमलेली असतानाच कोकीळचा सुरेल आवाज कानी पडला. मी इकडून ओरडून कोकिळेला साद घातल्यावर तिकडून  तो आणखीन जोराने ओरडत असे अशी जुगलबंदी बराच वेळ चालली, शेजारच्या एका झाडावर वेड्या राघूंचा जोडा दिसला. आता जंगल थोड विरळ झालं होत, खडकांवरून वाहत वाहत एक खळखळता झरा दिसला, झऱ्याच पाणी पीऊन मी तिकडे थोडा वेळ काढला. ढगांकडे सताड डोळ्यांनी बघत खडकांवर निवांत पहुडण्याचा आनंद काही औरच, झरयाच्या वर एका झाडाची फांदी आली होती, फांदीवर दोन पाकोळ्या बसल्या होत्या, आपल्या तारेसारख्या शेपट्या हलवत त्यांचा शो चालू होता, मग एकदा पंख फडफडुन झाले, खाली वाकून झालं, एकदा पुढून एकदा मागून सगळी प्रदर्शन झाली, झऱ्यात पाणी प्यायला वेगवेगळे पक्षी आले, पोंड हेरॉन, कारमोरंन्ट आले होते, शेजारच्या झाडाच्या ढोलीतून मैना डोकावत होत्या, आपल्या इवल्या इवल्या पिल्लांना भरवतानाच समाधान शब्दांपलीकडच होत. बरच भटकून झालं  होत एव्हाना उन्ह डोक्यावर आल होत, अजून आत आत जाताना बाहेर येताना संध्याकाळ झाली असती त्यामुळे तशीच माघारी फिरले. थोड्याच वेळात एक झकास पावसाची सर आली आणि चिंब भिजवून गेली, उन्हानी झालेली चिकचिक कमी झाली, खाटिक, मुनिया, हळद्या प्रीनिया सारखे पक्षी जाता जाता दर्शन देऊन गेले,  तळ्यापाशी पोहचेपर्यंत सायंकाळ झाली होती सांजवेळच्या किरणांनी परीसासारखी जादू केली होती सकाळी नीळ असलेल तळ्याच पाणी सोनेरी झालं होत. कुट, कोर्मोरंन्ट, पोंड हेरॉन अजूनही डुबक्या मारत होते, सगळ्यांना मुश्कीलीनी अलविदा करून प्रसन्न अनुभवांनी मी परतले....     

तेजश्री 

No comments:

Post a Comment