Monday, February 11, 2013

त्रिशुंड गणपती : श्री. उदयन इंदुरकर



काही अद्भुत ठेवा आपल्या पुण्यात, आपल्या हाकेच्या अंतरावरच्या परिसरात आहे...हे आज  नव्याने उलगडल. आजचा दिवस मी ठरवलं तरी विसरू शकणार नाही.  
तीन चार आठवड्यांपूर्वी दैनंदिनीच्या कामानिम्मित्त आपल्या वर्गावर व्याखानाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या  श्री. इंदुरकर सर  ह्यांच्याशी भेट झाली, यंदाच्या दैनंदिनीचा प्राचीन ६४ कलांचा विषय असण, त्यात मुखपृष्ठावरील त्रीशुन्ड्या  गणपतीच्या मंदिराच  चित्र असण, आणि  त्यावर सरांची एकच प्रतिक्रिया येण  , ' खूप काही बोलकी कलाकृती निवडली आहे तुम्ही मुखपृष्ठासाठी '  ... आम्हाला मात्र ह्या कलाकृती विषयी निवडक माहिती होती... पण सरांची तर  अभ्यासपूर्ण प्रतिक्रया... मग उत्सुकता जागली आणि सहज विचारलं... सांगाल का आम्हाला अजून ह्या विषयी? ... अधिक माहिती ऐकायला आवडेल आम्हाला...त्यावर सरांचा उत्स्फूर्त होकार ...   बस... ठरलं...सोमवार पेठेतील त्रीशुण्डया  गणपतीच्या मंदिराची इंदुरकर सरांबरोबरची भेट ! १० फेब्रुवारी सकाळी ८.३०, मोहीम त्रीशुण्डया गणपती ! दोन आठवड्यांपूर्वी वर्गावर जाहीर केल, आपण दैनंदिनीच्या निम्मित्ताने त्रिशुंड गणपतीचे जे मुखपृष्ठ घेतले आहे त्या साठी आपण त्रिशुंड गणपतीला जाणार आहोत, साऱ्या संचालकांनी, प्रशिक्षकांनी,  विद्यार्थ्यांनी पण कल्पना उचलून धरली, आपल्या रोजच्या दैनंदिनीच्या मुख्पृष्ठावर असलेल चित्र आहे तरी कोणत्या मंदिराच? आणि विशेष काय आहे त्यात .... उत्सुकता दोन रविवारमध्ये वाढली आणि छोटीशी सहल निघाली! 

आम्ही काही मोजके प्रशिक्षक येणाऱ्या  पाहुण्यांचं स्वागत  आणि स्वागत रांगोळी काढायला पुढे गेलो, वर्ग ८ वाजताच सुटला आणि वर्गावरील १७० विद्यार्थी दुचाकीवरून काही चारचाकीतून थेट त्रिशुंड गणपतीला ... रस्त्यावरून येताना  एखादी rally वगेरेच निघाली आहे अस वाटत होत .... वर्गाची ही एकी बघून सरांनीही बोलून दाखवलं हा पहिलाच असा वर्ग असेल ज्याचे एवढे विद्यार्थी अश्या एखाद्या स्थळाला भेट द्यायला आले असतील... गणपती पायघडी व्यतिरिक्त अस रस्त्यावर एवढ्या मोठ्या संख्येने उतरण्याचा हा पहिलाच प्रयत्न ......

गणेश जयंती चार दिवसांवरच आलेली असताना हा योग इतका छान जुळून आला की त्रिशुंड गणपतीचा सभामंडप भाविकांनी भरून गेला ... सरांची ओळख झाली आणि विवेचनाला सुरवात झाली... 
Trishund Ganpati Photo - Trishund Ganpati, Pune, India

साधारण २५० वर्षांपूर्वी म्हणजे पेशवेकाळात जेव्हा आपली संस्कृती टिकवली जात होती तेव्हा ह्या मंदिराची स्थापना झाली पेशव्यांनी जी प्राचीन शिल्पकला, किंवा मंदिर बांधण्याची कला लुप्त होत चालली आहे त्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून हे मंदिर बांधण्यास घेतले, आपल्या दैनंदिनीचा नेमका 'प्राचीन लुप्त कलांवर प्रकाशझोत' टाकण्याचा प्रयत्न सांकेतिकपणे सुचवणार हे चित्र मुख पृष्ठावर अचूक असल्याच जाणवलं.  
हे मंदिर संपूर्ण दगडात बांधलेलं असून भिमगिरी स्वामी, म्हणजे ह्या मंदिराचे स्थापनकर्ते ह्यांचा मठ, समाधी आणि त्रिशुंड गणपती ह्या तिन्ही गोष्टी एकाच वास्तुत असल्याच सुरवातीला सांगून सरांनी मंदिराच्या छोट्या छोट्या शिल्पकलांबद्दल अधिक माहितीस प्रारंभ केला,   
हे मंदिर सुरवातीला शिवाच मंदिर म्हणून बांधण्यास सुरवात केल्यामुळे ह्या मंदिरातील अनेक ठिकाणच्या शिल्पकलांवर शिवाच्या देवळात वापरल्या जातात तश्या काही विशेष धाटणीच्या शिल्पांची निर्मिती ह्या मंदिरात दिसते, 
मंदिरावर दिमाखात  उठून दिसणारी ललाटपट्टी , त्यावरच ललाटबिंब आणि त्यावरचा त्रिशुंड गणपती , सर म्हणाले ललाटबिंबावर मुळच्या गाभार्यातील देवतेचीच प्रतिकृती लावण्याचा प्रघाद होता,  आणि ह्या गणपतीच्या प्रतीकृतीमुळे इतर मंदिरातही आधुनिक काळात गणपतीच आढळून येतो आणि त्यालाच गणपती पट्टी असेही म्हणतात. 
अनेक गोष्टी आपल्या मंदिरातून दाखवाव्यात अस साहजिकच वाटत असल्याने घरापुढे जशी रांगोळी काढतात त्याचा नेमका वापर येथे सुशोभन करण्यास केला आहे. द्वारासामोराचा उंबरठा ज्याला 'चंद्र्शीला' म्हणतात त्यावरही केलेली कलाकुसर फारच लोभस आहे.
 द्वाराच्या दोन बाजूला जय विजय असून वर दोन हत्ती आहेत, त्यांच्या मुखातून एक तोरण निघते ज्याचे दुसरे टोक एका देवीवर आहे...  ही देवी म्हणूनच गजांत लक्ष्मी म्हणूनही ओळखली जाते... ह्याच्या बाजूला विविध संमिश्र प्राणी आहेत ज्यांना 'व्याध' म्हणतात, जसे तोंड हत्तीचे, देह सिंहाचा तो गजव्याध म्हणजे मुख असणाऱ्या प्राण्याच्या नावाने ओळखला जातो. ह्या मागे कमीत कमी  जागेत विविध कलाकृतींचा अविष्कार करणे अशी मानसिकता कलाकाराची असते.   ह्या शिल्पावर मोर, पोपट असे अनेक प्राणी दिसून येतात, मात्र गजांत लक्ष्मीच्या बरोबर वरती चढत वर जाणारी माकडे कोरली आहेत. ही माकडे मात्र प्राचीन काळात आधुनिक कलेच्या दृष्टीने केलेले बदल आहेत अस सर म्हणाले. सगळ्यात वर शेषधारी म्हणजे शेष नागावर चक्क झोपलेला विष्णू दाखवला आहे. त्यावर काळानुरूप कळसाची रिक्त झालेली जागा दिसते... 
बाजूलाच आठ दिशांचे रक्षक म्हणजेच दिकपाल कोरले आहेत, 

चार पुढे आलेले खांब आहेत त्यावर कीचक उलटे लटकताना दिसतात, त्यांच्या हातात साखळ्या दिसतात त्यावर मंदिराचे छत आहे... हे छत त्यांनी उचलून धरले आहे... म्हणजेच छत मंदिरावर टेकलेले नाही... मधली मोकळी जागा अवकाश दर्शवते... काय कल्पना आहे बघा... अवकाश दाखवूनही न दिसणारी म्हणजे अव्यक्त गोष्ट..एक निर्वात पोकळी अश्या 'व्यक्त' माध्यमातून साकारायची...अचाट कल्पना...  कलाकारांना दाद द्यावी तेवढी थोडीच आहे.. 


मात्र ह्या मंदिरामध्ये अतिशय नोंद घ्यावी अस काही असेल तर खाली कोरलेली त्यावेळचे सामाजिक भान ठेवणारी सूचक गोष्ट ! त्या काळात इंग्रजांचे राज्य भारतावर होते, त्यांनी तेव्हा आसामच्या राजाला पकडलं होत, आसामच प्रतिक म्हणजे गेंडा त्याला साखळदंडांनी बांधून घेऊन जाणारे इंग्रज बाजूला दिसत आहेत...
 

खाली दिसत असलेले हत्ती आपापसात जुंपत आहेत... असेच भांडत राहिलात तर इंग्रजांना तुमच्यावर जय मिळवणे सहज शक्य आहे असा संदेश मार्मिक पणे  त्याकाळच्या समाजाला कलाकारांनी दिला आहे. 

आत गेल्यावर बऱ्यापैकी मोठे सभा मंडप आहे, सभामंडपाची रचना आणि वरचा घुमट पाहण्यासारखा आहे, खाली विष्णूचा द्वितीय अवतार म्हणजेच कूर्म कोरला आहे, त्या भोवती तैल रंगांनी रंगवून  रांगोळी काढली आहे,  
हा सभामंडप विवध कलाकारांना आपली कला देवापुढे सादर करण्यासाठी असलेल हक्काच व्यासपीठ ! 
पुन्हा सभामंडपातून आत जात असताना द्वारावर जय विजय, गजान्तलक्ष्मी कोरलेले दिसतात, अजून थोडी मोकळी जागा सोडून मग आता गर्भगृह आहे, गर्भगृहाच्या मध्यभागी मोरावर विराजमान असा त्रिशुंड गणपती, 
हा गणपती उच्छित गणेश म्हणून संबोधलं जातो. गणपतीच्या डाव्या मांडीवर रिद्धी बसलेली आहे. मानवातल्या कामभावना देवातांमध्येही असल्याचे सुचवणारा हा गणपती हठयोगी लोकांकडूनच पुजला जातो. 



 


मंदिराच्या डाव्या बाजूला नटेश्वराची फार छान मूर्ती कोरली आहे, 


ह्या नटेश्वराच्या प्रत्येक कृती मागे मोठे तत्वज्ञान आहे, त्यात लपलेले विज्ञान पाहून आजही अचंबित व्हायला होते... 
ह्या नटेश्वराखाली अपस्मार नावाचा बुटका पुरुष आहे, हा बुटका पुरुष वाईट प्रवृत्तींच प्रतिक मनाला असून त्याचा नाश नटेश्वराकडून नक्की असल्याचे हे ही मूर्ती सुचवते, त्याचा डावा पाय उचलेला असून तो मोह मायेला दर्शवतो मात्र, ज्यांना मोक्ष हवा असेल त्यांना तो माझ्याकडून मिळेल असे आश्वासन त्या पायाकडे दर्शवल्या हातातून दिसते. बाजूला असलेली विश्वाची सीमारेषा नटेश्वरानी स्पर्शली आहे तेथे पंचमहाभूतांनी हे विश्व बनलेले आहे असे सूचकपणे कोरलेले दिसते,  
देवळाच्या पाठीमागे लिंगोद्भवाची छानशी मूर्ती आहे.
 

ह्यात शंकर अव्यक्त रुपात म्हणजे पिंड रुपात आहेत, एकदा अग्निरूपी काळाचा आदि आणि अंत शोधण्यासाठी गेलेले  ब्रह्मा आणि विष्णू  कलाकारांनी विश्णु मूषक रुपात , म्हणजे उंदराच्या रुपात  तर ब्रह्माला हंसाच्या  रूपात दाखवले आहे. मात्र त्यांचा यत्न अखेर आदिदेव शंकरापाशी येउन थांबला अस ह्या मागची पुराणकथा सांगते. अणु म्हणजे शिव आणि त्याचे शक्तीत रुपांतर म्हणजे ज्वाला हे शिवशक्तीचे प्रतीकात्मक रूप असल्याचे जाणवते.   इतक्या विचारांती साकारलेल्या ह्या कलाकृती बघताना थक्क व्हायला होते. 
अवकाश म्हणजे शिव तर वेळ किंवा काळ म्हणजे विष्णू अश्या दोन देवतांचे पूजक समाजात वेगवेगळे होते शिवभक्त आणि वैष्णव म्हणजे विष्णू भक्त ,  मात्र सगळे देव समानच आहेत, आणि असा देवांच्या पुअनवरुन भेदभाव समाजात होऊ नये ह्यासाठी मंदिराच्या उजव्या बाजूला हरी-हराची मूर्ती आहे,  

म्हणजे शिवभक्तांना वाटते आपण शिवापुढे नतमस्तक आहोत पण आपोआप हात विष्णूपुढे जोडले जातात आणि वैष्णवांना वाटत आपला देव श्रेष्ठ मात्र ते शिवापुढे अजाणते पाणी माथा टेकतात.  काय बोलके भाव आणि विचार आहेत कलाकाराचे... 

असे एक न अनेक अर्थ इंदुरकर सरांबरोबर समजून घेत असताना खूपच छान वाटल... मग प्रश्नोत्तरातून शंकांचं निरसन झाल...
हे मंदिर सुरवातीला  बांधताना शिवाच मंदिर म्हणून बांधण्यास सुरवात केलेली होती तसा उल्लेखही जवळील फलकावर केलेला आहे नेमक्या त्याच भावनेने शिव-शक्ती कलेची देवता अस आणि कलांचा उगम मंदिरात झाला असे धागे दोरे साहित्यात सापडल्याने एक कलेच उगमस्थान दाखवणार प्रतिक म्हणून  ह्याच मंदिराची मुख पृष्ठासाठी निवड केली गेली होती....  मात्र हे अजून बारकावे समजल्यावर आणखीन समाधान लाभल, 
ह्या वर्षीच्या दैनंदिनीच्या निम्मित्तानी आपल्या पुण्याच्या संस्कृतीचा, कलेचा ठेवा  रसग्रहित करता आला 
हा ठेवा स्मरणात राहावा म्हणून मुद्दाम शब्दबद्ध करावासा वाटला, ज्यांच्या पर्यंत हा पोहचला नाही त्यांच्या पर्यंत पोहाचावासा वाटला म्हणून केलेला हा छोटासा यत्न!


तेजश्री 
१०.०२.२०१३ 

6 comments:

  1. khuup sundar shabd mandani......dolyasamor ubha rahtay chitra....

    ReplyDelete
  2. tejashree Dhanyavad
    khup chan mahiti dilis.

    ReplyDelete
  3. Mast cha ga...teju..mala tya veli nahi jamle yayla..i missed tht.:(.pan ha blog vachun saglicha mahiti kalali..thnx :)

    ReplyDelete
  4. most welcom poonam...pan kharach tu miss kel...te je sngat hote na to anubhaw jabardast hota...

    ReplyDelete