Wednesday, June 6, 2012

पर्यावरण प्रेमींनो... दिवसाचे ढोंग कशापायी?


५ जून जागतिक पर्यावरण दिन सगळीकडे एकच नारा झाडे लावा झाडे जगवा.. काहींनी मोफत रोपे वाटली, मग कुठे पशुपक्षांवर प्रेम करा, नाहीतर कुठे प्रदूषण टाळा, प्लास्टिकचा वापर टाळा, कॅरीब्यागला नाही म्हणा अश्या घोषणा! अरे पण पर्यावरण प्रेमींनो हे सगळ लाख टक्के खर असल तरी नुसत्या घोषणा देऊन काय होणारे? हे आचरणात कधी येणार? हे असल बिनबुडाच दिवसाच ढोंग कशापायी? 
पर्यावरण प्रेमींनो एका दिवसापुरती झाडं लावून जितक पुण्य तुम्ही कमवू इच्छिता (अर्थात माझ्या मते हे फक्त लोकप्रसिद्धी आणि मत मिळवण्याचे कारभार आहेत) तेवढ तुम्ही ते वर्षभर ती लावलेली झाडे न जगवून गमावता; खरतर त्याच पापच लागत असेल...  ह्या फुकटची रोपटी जमिनीत खोवण्याच्या विवीध पोझ देणाऱ्या झुट्या आशिकांच्या घरी किती झाडं आजतागायत लावली असतील? किती जागवली असतील? लावलीही असतील पण त्यांच्या कडे स्वतः कितींनी लक्ष दिले असेल? की चार पैसे फेकले असतील? इथे ते प्रेम कुठे जात म? लोका शिकवावे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण...  म्हणजे अगदी कालच वटपोर्णिमा झाली हाच पती सात जन्म मिळावा म्हणून किती फांद्या तोडल्या गेल्या वडाच्या ?  (आजकालच्या नविन संकल्पने प्रमाणे वडाच्या फांद्या घरात आणून पूजा करण्याची प्रथा आहे... त्यानी दूर वडापर्यंत जावे लागत नाही.. गर्दी गोंगाट टाळतो...)  हीच कथा दसर्याची...... सोने लुट नावाच्या पूर्वजांच्या आशेची अपेक्षांची चक्क नासाडी करताना कुठे जाते हे प्रेम? ह्याला पर्याय का नाही शोधले जात ? 
तीच गोष्ट प्रदूषणाची.... हवेच्या प्रदुषणा बद्दल तर बोलायलाच नको ध्वनी प्रदूषणाचा तर आनंदी आनंदच आहे आज काल वाट्टेल ते कारण शोधून धांगडधिंगा करण्याची खोडच आहे.. आणि सगळ्यात  हसू तर त्या दिवशी आल जेव्हा मी वर्तमानपत्रात वाचलं दोन चिमुकल्यांवर पखवाज वाजण्याची बंदी केली का तर म्हणे ध्वनी प्रदूषण होते... अपुर्या ज्ञानापायी चुकीच्याच गोष्टींना विरोध करण्याची जणू प्रथाच आहे.. पखवाजाने जर ध्वनी प्रद्षण होत असेल तर त्या ध्वनी प्रक्षेपकाच्या चळती त्या विघ्नहर्त्या समोर लावलेल्या असतात तेव्हा हा कायदा कुठे जातो? डोळे बांधलेल्या न्यायदेवतेचा अश्यावेळी राग आल्यावाचून राहील का? 
अशी विरोधाभासी गोष्ट प्लास्टिक वापराबाबत ... केली आणायला गेलं मग कॅरीब्याग, कपडे खरेदीला गेलं हक्काची मागणी...तीच गोष्ट किराणा मालाची, रोजच्या जीवनावश्यक गोष्टीची, भाजीपाल्याची सगळ काही त्या प्लास्टिक मध्ये कोंबल्याशिवाय घरीच येत नाही ... एकदा मी माझ्या भाची साठी फ्रॉक खरेदीला गेले, तेव्हा मी प्लास्टिक कॅरी ब्याग देऊ नका म्हणून सांगितलं तर ती काउंटरवरची सुंदरी मझ्याकड बघतच राहिली अश्या काही अचंबितपणे की मला वाटल मी काही चूक केली..पुढे मला विचारते अहो म तुम्ही तो बॉक्स घरी कसा नेणार..मी जेव्हा म्हणल माझ्याकडे कापडी पिशवी आहे तरी तिने तिचा हट्ट सोडला नाही... म्हणजे मुळात आपल्या दुकानाची प्रसिद्धी व्हावी हा हेतू त्यामागे लपलेला असेल तर प्लास्टिक वापर टाळण्यासाठी आपण पाऊले कशी उचलणार ? 
६ R  नियमाप्रमाणे Refuse (नाकारा) , Reuse (पुनःवापर), recycle (पुनः श्चक्रण) , remind  (लक्षात ठेवा )  repair (दुरुस्त करा), respect (आदर करा) हे सहा नियम योग्य प्रकारे वापरले गेले तर वसुंधरेच हरवलेलं सौंदर्य परत लवकरच मिळेल. 
हो पण पर्यावरण दिनाच्या दिवशी नारे द्यावेत, जनजागृती करावी, ह्यावर माझा आक्षेप नसून फक्त त्या दिवसापुरताच ते मर्यादित नसावं... पर्यावरण प्रेमींनो प्रेम करायचं तर जन्मभर करा एकनिष्ठ राहा .... एका दिवसाचं ढोंग कशाला? 

तेजश्री
६.६.२०१२       

1 comment:

  1. हे तुमचे म्हणे बरोबर आहे पण आता सर्वांनी बोलण्यात वेळ न घालवता करण्यात घालावावा

    ReplyDelete