Sunday, August 7, 2011

समुद्र किनारा


एका मोठ्याश्या दगडावर मी बसले होते, डोळ्यासमोर थेट क्षितिजापर्यंत समुद्राच्या लाटा उसळत होत्या, एक लाट विरते तोस्तवर दुसरी तयार झालेलीलाटांच नीळशार पाणी त्या निळ्या रंगात सहजतेने आपला रंग विरघळवणार आकाश, आकाशात एक तळपता लालबुंद गोल, आता काही क्षणातच हा गोल इतका तळपेल इतका तळपेल की त्याला शांत व्हायला जलसमाधी घ्यावी लागेल, त्या लाल गोलाच अस्तित्व त्याच्या पुरत मर्यादित नाही तर ते अवताली भवताली पसरलेल, लाल केशरी पिवळा, निळा, जांभळा अश्या रंगांच्या असंख्य छटा, अगदी ज्या रंगपेटीतही नसतील अश्या, अतिषय मोहक, सुंदर... ब्रशने उभे, आडवे तिरपे कसेही जरी फटकारे एखाद्या थोर चित्रकाराने मारले तरी त्यातून जस उत्कृष्ठ चित्र बनत अगदी तसच ह्या छटा बघून मला वाटल...काय थोर असेल तो कलाकार!! समुद्राच्या पल्याड तो भेटला आकाशाला आणि अल्याड भेटला किनार्याला. किनाऱ्यावरची मऊ मऊ वाळू सोनेरी चकाकणारी सूर्यकिरणे थेट परावर्तीत करत होती. किनार्यावरल्या रेतीत खेकडे पाय खुपसून चालत होते आणि त्यांच्या नांगीने रेखीव नागमोडी रेषा तयार झाल्या होत्या. अनेक रंगीबेरंगी शंख शिंपले विखुरले होते. त्या वाळूत कैक तासान तास लहानगी मुल खेळत होती. अगदी क्षणिक आनंदासाठी सुद्धा त्यानी तो वाळूचा किल्ला हौसेने बांधला होता, त्या किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी खंदक खोदले होते, त्या खंदकात ओंझळी ओंझळीतून  पाणी आणून भरतानाचा निरागस आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. किनार्याच्या बाजूला जणू रक्षणासाठी उभी केल्यासारखी नारळाची पोफळीची झाडं दूर पर्यंत पसरलेली होती, झाडांच्या आडून हळूच डोकावणारी लाल उतरत्या टोपीची कौलारू घर फारच मोहक दिसत होती,  पुन्हा नजर फिरून समुद्राकडे गेली आणि पाण्यात पांगलेली  शिडाची जहाज दृष्टीस पडली, वार्याचा दिशादर्षकाप्रमाणे वापर करत त्या जहाजांनी अगदी अचूक दिशा पकडली होती, कुठे न भरकटता त्यांची मार्गक्रमणा चालू होती, कुठे मधूनच  समुद्रावरून उडणारे सीगल पक्षी दिसत होतेकुठे दूरवर डॉल्फिन पाण्याबाहेर येऊन उड्या मारण्याची प्रात्यक्षिक करत होते. कुठे मधेच एखादा पक्षी झपकन झेप घालून एखादा मासा पकडून आपल्या पिल्लांसाठी नेत होता, एव्हाना लाटांचा जोर बऱ्यापैकी वाढला होता मगाशी फक्त पदस्पर्शणारी लाट आता कमरेपर्यंत वर आली होती, खाऱ्या पाण्याचा वास  अवतीभवती दरवळत होता. आकाशातल लाल सफरचंद एव्हाना समुद्राने खाऊन टाकल होत.  एक मंद मंद संधिप्रकाश पसरला होता. कितीदा समुद्र बघितला असेल त्यात खेळले असेन, दरवेळेस नव्याने मोहात पडणारा समुद्र किनारा मात्र हा किनारा काही वेगळाच होता, मनाच्या कोपर्यात दडलेला दडून सुद्धा स्वच्छ छबी असलेला!!!!

तेजश्री 
०७.०८.२०११  

No comments:

Post a Comment